Join us

उद्या पानसरेंच्या खुनाचा उमा पानसरेंवर आरोप कराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 5:18 AM

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर २०१५ मध्ये समीर गायकवाड याने गोळ्या झाडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर २०१५ मध्ये समीर गायकवाड याने गोळ्या झाडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतर गेल्या चार वर्षांत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तीन वेगवेगळी कथानके मांडली आहेत. त्यामुळे भविष्यात उमा पानसरे यांनीच पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप तपास पथकाने केला तर नवल वाटायला नको, अशी टीका हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली.ते म्हणाले, तपास यंत्रणांनी हिंदू धर्मविरोधी यांच्या दबावातून २०१५ मध्ये समीर गायकवाड यांनी पानसरेंवर गोळी झाडल्याचा आरोप करत अटकसत्राला सुरुवात केली. तेव्हा गायकवाड सनातनचा साधक आहे आणि तो निर्दोष असल्याचा दावा आम्ही केला होता. आज समीर गायकवाड जामिनावर मुक्त असून पोलीसही त्याच्याविरोधात जामीन रद्द करण्याचा खटला चालवत नाहीत. त्याआधी सीबीआयने सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी गोळ्या झाडल्याचा आरोप केला होता. आता सीबीआय सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांनी गोळ्या झाडल्याचा आरोप करत आहे. सातत्याने मारेकºयांची नावे बदलली जात आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि सीबीआयने दाखल केलेला अर्ज यांमध्येही गोळ्या लागण्याच्या अवयवांत तफावत दिसत आहे. त्यामुळे सीबीआय तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.