"उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:14 PM2020-09-09T13:14:51+5:302020-09-09T13:24:37+5:30

मुंबईला पीओकेची उपमा देणाऱ्या कंगनाला दणका देताना मुबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावार हातोडा चालवला आहे.

"From tomorrow, we will send a list of unauthorized constructions every day and follow up for action." - Ashish Shelar | "उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार"

"उद्यापासून रोज अनधिकृत बांधकामांची यादी पाठवणार, कारवाईसाठी पाठपुरावा करणार"

Next


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात पेटलेला वाद आता विकोपाला गेला आहे. मुंबईला पीओकेची उपमा देणाऱ्या कंगनाला दणका देताना मुबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावार हातोडा चालवला आहे. दरम्यान, कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई सुडबुद्धीने करण्याता आली असल्याचा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबईत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी उद्यापासून रोज मुंबई महानगरपालिकेला पाठवणार असून, त्यावर २४ तासांत कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयावर हातोडा चालवल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, कंगना राणौतने मुंबईबाबत केलेल्या विधानांचं भाजपा समर्थन करत नाही. मात्र कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई ही सुडबुद्धीने करण्यात आली आहे, असे माझे मत आहे. कंगनाचं कार्यालय जर अनधिकृत असेल तर ते आजचं नाही. मग कारवाईसाठी हीच वेळ का निवडण्यात आली हा प्रश्न आहे. तसेच जर हे अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर आधीच कारवाई करता आली असती.

दरम्यान, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामं आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व परिसरामध्येही अनेक अनधिकृत बांधकामं आहेत. मात्र महानगरपालिकेने कधी एवढ्या तत्परतेने कारवाई केली नव्हती, आता मुंबईत असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी उद्यापासून रोज मुंबई महानगरपालिकेला पाठवणार असून, त्यावर २४ तासांत कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे आशिष शेलार यांनी सांगितले. 

कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर  कारवाई

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आणि अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका करणाऱ्या आणि मुंबईची पीओकेशी तुलना करून अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई महानगरपालिकेने आज दणका दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्याच्या कारवाईस मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. 

मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाबाहेर काल नोटीस लावली होती. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून, रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. ती आज सकाळी साडे दहा वाजता संपली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत भाग तोडण्यास सुरुवात करण्यात आली.

Web Title: "From tomorrow, we will send a list of unauthorized constructions every day and follow up for action." - Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.