Join us  

उद्यापासून वज्रेश्वरीदेवीची यात्रा, भक्तांचा महापूर उसळणार

By admin | Published: April 15, 2015 10:55 PM

महाराष्ट्रातील लाखो आगरी, कोळी, भंडारी, कुणबी समाजांची कुलदेवता असलेल्या वज्रेश्वरीदेवीची यात्रा शुक्रवार, १७ एप्रिलपासून सुरू होत आहे.

दीपक देशमुख ल्ल वज्रेश्वरी महाराष्ट्रातील लाखो आगरी, कोळी, भंडारी, कुणबी समाजांची कुलदेवता असलेल्या वज्रेश्वरीदेवीची यात्रा शुक्रवार, १७ एप्रिलपासून सुरू होत आहे. ती रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्ताने यात्रेच्या पहिल्या दिवशी श्रींची महापूजा आणि दीपपूजा होऊन प्रारंभ होणार असून चैत्र अमावस्येला यात्रा आहे. १९ ला रात्री १२ वाजता देवीचे मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा होणार आहे. देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील इतर सर्व देवींचा यात्रा उत्सव पौर्णिमेला साजरा होत असतो, पण वज्रेश्वरीदेवीचा यात्रा उत्सव हा चैत्र अमावस्येला संपन्न होत असतो.देवीच्या यात्रेसंबंधी ऐतिहासिक कथा अशी की, चिमाजी आप्पांनी वसई काबीज करण्यासाठी जाताना देवीला नवस केला की, मी वसई किल्ला सर केला तर तुझे मंदिर मी किल्ल्यासारखे बांधून जीर्णोद्धार करेन. तेव्हा, कडवा प्रतिकार केल्यानंतर पोर्तुगिजांकडून चिमाजी आप्पांनी वसई सर केली आणि लगेच मंदिराचे काम हाती घेऊन देवीचे किल्लेवजा मंदिर बांधले. या दिवशी जीर्णोद्धार करून देवीची प्रतिष्ठापना केली, तो दिवस चैत्र कृष्ण चतुर्दशीच होता. तेव्हापासून या देवीच्या यात्रा उत्सवास सुरुवात झाली.दुसऱ्या दिवशी चिमाजी आप्पांनी नवस फेडला तेव्हापासून दुसऱ्या दिवशी चैत्र अमावस्येला यात्रा दिवस साजरा करण्यात येतो. म्हणून नवसाला पावणारी देवी अशी तिची ख्याती आहे. लाखो आगरी, कोळीबांधव देवीला नवस बोलून नवस फेडण्यासाठी येत असतात. आगरी, कोळीबांधवांबरोबरच मराठा, भंडारी, कुणबी आणि इतर ज्या समाजांची देवी कुलदेवता आहे, ते समाज कोंबडे, बकरे यांचा बळी देऊन नवस फेडत असतात. वैशाख शुद्ध प्रतिपदेला देवीचा मुख्य आकर्षण असलेला पालखी सोहळा असतो. रात्री १२ वाजता मंदिरातून पालखी निघून संपूर्ण गावातून मिरवणूक काढून सकाळी ७ वाजता मंदिरात पालखी नेण्यात येते. याप्रसंगी लाखो भाविकांची देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असते. या निमित्ताने याच परिसरात असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांवर आंघोळ करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील जनतेला अनेक चीज वस्तू खरेदी करण्याची संधी या यात्रेत लाभत असते.राज्याबाहेरून भाविकांची रीघनवसाला पावणारी देवी असल्यामुळे दर्शनासाठी, नवस करण्यासाठी राज्याबरोबरच गुजरातमधूनही मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मुंबई, ठाणे, रायगड याबरोबर घोटी, सिन्नर, इगतपुरी येथील नाथ संप्रदायाचे भाविक या वेळी नवीन बैलजोडी विकत घेऊन तिला देवीदर्शनासाठी आणतात. ती शेतीच्या मशागतीसाठी वापरली की समृद्धी येते अशी त्यांची श्रद्धा आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात मिठाई दुकाने, संसारोपयोगी साहित्य, शेतीचे साहित्य, कोळी लोकांसाठी मासे पकडण्याच्या जाळ्या, मनोरंजनासाठी पाळणे अशी दुकाने थाटण्यात येतात. या यात्रा उत्सवासाठी स्थानिक ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन, गणेशपुरी पोलीस प्रशासन यांनी भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, विरार, वाडा, येथून एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येत आहेत.