भावी अधिकाऱ्यांची आयोगाविरोधात जीभ घसरली..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 05:40 AM2021-12-31T05:40:28+5:302021-12-31T05:40:47+5:30
Mumbai : वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर २ जानेवारी रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा एमपीएससीने स्थगित केली.
मुंबई : वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक संधी मिळावी, या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एमपीएससीकडून २ जानेवारीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली. पण, परीक्षा रद्द केल्याचा असंतोष उमेदवारांकडून सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्यात येत आहे. काही उमेदवार समाज माध्यमावर मते व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरून संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आल्याचे आयोगाने म्हटले आहे. अशा उमेदवारांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.
वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर २ जानेवारी रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा एमपीएससीने स्थगित केली. मात्र, याआधीही आयोगाकडून अनेक परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलल्या असल्याने आणि वेळेवर न लागणारे निकाल यावर बोट ठेवून उमेदवार विविध समाज माध्यमांवर आयोगाविरोधात टीका करीत आहेत. त्यामुळे असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेत टीका किंवा समाज माध्यमावर मत व्यक्त करणाऱ्या उमेदवारांवर स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून कायमस्वरुपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी प्रतिरोधित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
...म्हणून परीक्षा पुढे ढकलली
नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या निश्चिती झाल्यानंतर या उमेदवारांसाठी नव्याने परीक्षा केंद्र निश्चिती, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण व तत्सम व्यवस्था करणे इत्यादी स्वरुपाची तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना किमान कालावधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.