मुंबई : आधी ओळख वाढवली आणि कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी काही तासांसाठी कार हवी आहे, असे सांगत घेतली आणि थेट दुसऱ्या राज्यात धूम ठोकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात बाझमोहम्मद अलिमोहम्मद जानमोहम्मद खान या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णन रामनाथन (६५) हे एका खासगी सिक्युरिटी कंपनीत एमडी म्हणून काम करतात. त्यांच्या फोर्ट कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आझम शेख आणि झरीर वझीर या मित्रांमार्फत २०२० रोजी रामनाथन यांची खान याच्यासोबत ओळख झाली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १८ जुलै रोजी खान याने रामनाथन यांना फोन करत लालबाग मेन रोड या ठिकाणी यायला सांगितले. तिथून खासगी कारने ते खान सोबत त्यांच्या मरोळ येथील कार्यालयात पोहोचले. तेव्हा खान याने कुटुंबासह हाजी अली या ठिकाणी फिरण्यासाठी त्यांच्या १५ लाख रुपये किमतीच्या होंडा कारची मागणी केली. तक्रारदार गेल्या दोन वर्षांपासून खान याला ओळखत असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत कार त्याला वापरण्यासाठी दिली.
त्यांची कार खान याने परत आणलीच नाही. उलट त्याच कारने तो अजमेर, सोनिपत, पानिपत, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी फिरत असल्याचे तक्रारदाराला त्यांच्या कारमधील फास्टट्रॅकवरून समजले. तेव्हा रामनाथन यांनी त्याला वारंवार फोन करत कार परत देण्यास सांगितले. मात्र, तो आज देतो, उद्या देतो, सांगून टाळाटाळ करू लागला. अखेर रामनाथन यांनी सहार पोलिसात तक्रार दिली.