आधी ढोरमेहनत करून घेतली, काम निघताच काढून टाकले; कंपनीवर फसवणुकीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 09:41 AM2023-12-27T09:41:29+5:302023-12-27T09:42:08+5:30
५० दिवसांपासून आझाद मैदानावर; आरोग्य विभागातील शेकडो शिकाऊ कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुण्यातील यशस्वी अकादमी फॉर स्किल या कंपनीने फसवणूक केली असल्याचा आरोप कोविड काळात आरोग्य विभागात शिकाऊ डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम केलेल्या उमेदवारांनी केला आहे, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी पद्धतीने समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी या उमेदवारांचे मागील ५० दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने राज्यभरातील ३,२०२ तरुणांचे भवितव्य अंधारात आहे.
राज्य सरकारने मेसर्स यशस्वी अकादमी फॉर स्किल या कंपनीला सप्टेंबर २०२१ मध्ये आरोग्य विभागात कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पुरवण्याचे काम दिले. या कंपनीने शिकाऊ उमेदवार म्हणून राज्यभरात नियुक्त्या केल्या. त्यांना महिना केवळ ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. या उमेदवारांचे महिन्यातून केवळ एक तास प्रशिक्षण घेतले जात होते.
प्रशिक्षणाच्या नावावर करून घेतले अधिक काम
हे उमेदवार प्रत्यक्ष काम करत होते तिथे प्रशिक्षक नव्हते. प्रशिक्षणाच्या नावावर स्थायी नोकरदारांपेक्षा यांच्याकडून जास्त काम करून घेतले जात होते. शासनाच्या सर्व कार्यक्रमाच्या ऑनलाइन डाटा एन्ट्री या उमेदवारांकडून करून घेतल्या गेल्या. दोन वर्षे दोन महिने काम केल्यानंतर लहानसहान कारणे देत आता कंत्राटदाराने या उमेदवारांना कामावरून कमी केले आहे, असे उमेदवार सांगतात.
त्या अधिकाऱ्यांची चौकशी करा
मेसर्स यशस्वी कंपनीला २०१९ साली तीन वर्षे कालावधीसाठी नियुक्त करण्यात आले होते. हा कालावधी २०२२ साली संपुष्टात आला. मात्र, त्यापूर्वीच २०२१ मध्ये याच कंपनीबरोबर तीन वर्षांसाठी पुन्हा करार करण्यात आला. हा करार करताना नियुक्त कंत्राटी शिकाऊ उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी किती राहील, विद्यावेतन किती असेल, याचा उल्लेख करारात नव्हता, त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा करार केला त्यांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
आम्ही कोरोनाकाळातही काम केले. त्यामुळे शासनाने आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे.
- विशाल चव्हाण, सचिव, महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य कामगार संघटना
हजारो उमेदवारांचे हे आर्थिक आणि शारीरिक शोषण आहे. चांगले काम करूनही ना योग्य वेतन दिले गेले आणि ना कराराचे पालन केले गेले. यशस्वी कंपनीला शिक्षा व्हावी; अन्यथा तीव्र आंदोलन करू. -अक्षय जैन, अध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेस.
मुले २ महिन्यांपासून कामावर नाहीत. प्रशिक्षणार्थी असल्याने त्यांना कामगार कायदा लागू नाही. तरीही ते संपावर गेले. त्यामुळे रेकॅार्ड ठेवण्याचे काम ठप्प झाल्याने आम्ही दुसरी मुले घेतली. -योगेश राणगेकर, जनसंपर्कप्रमुख, यशस्वी अकादमी फॉर स्किल