‘पैसे गिळूनही तिकीट येई ना’

By admin | Published: October 21, 2015 03:27 AM2015-10-21T03:27:39+5:302015-10-21T10:11:32+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्य रेल्वेवरील सीएसटी येथे नाणी किंवा नोटा मशिनमध्ये टाकून तिकीट देणाऱ्या तसेच स्मार्ट कार्ड रिचार्ज

'Took money by taking money' | ‘पैसे गिळूनही तिकीट येई ना’

‘पैसे गिळूनही तिकीट येई ना’

Next

-  सुशांत मोरे,  मुंबई
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्य रेल्वेवरील सीएसटी येथे नाणी किंवा नोटा मशिनमध्ये टाकून तिकीट देणाऱ्या तसेच स्मार्ट कार्ड रिचार्ज करणाऱ्या सीओटीव्हीएमचा (करन्सी कम कॉईन कम स्मार्ट कार्ड आॅपरेटेड आॅटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन) शुभारंभ मोठ्या थाटामाटात नुकताच करण्यात आला. पण ‘पैसे गिळूनही तिकीट काही येई ना’ अशी या मशिनची गत झाली आहे. अनेक प्रवाशांची नाणी व नोटा या मशिनमध्ये जातात, पण तिकीट मिळत नसल्याने रिकाम्या हातानेच त्यांना परतावे लागत आहे.
या मशिनमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी विना सवलतींचे दुसऱ्या श्रेणीचे तिकीट व उपनगरीय गाड्यांसाठी दुसऱ्या व प्रथम श्रेणीचे तिकीट तसेच रिटर्न तिकीट मिळण्याबरोबरच स्मार्ट कार्डचेही रिचार्ज करण्याची सोय आहे. सध्या मध्य रेल्वेवरील सीएसटी येथे चार, दादर, एलटीटी येथे प्रत्येकी दोन व पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, दादर, मुंबई सेंट्रल येथेही प्रत्येकी दोन मशिन बसवण्यात आल्या आहेत.
परंतु कमी अंतरावरील तिकीट काढण्यासाठी ५ रुपयांचे नाणे मशिनमध्ये टाकताच प्रवाशांना तिकीट तर मिळत नाहीच शिवाय पैसेही परत येत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. स्मार्ट कार्डचे रिचार्ज करतानाही अनेक वेळेला अशा घटना घडत असल्याचे समोर आले आहे. रिचार्ज करण्यासाठी १00 रुपयांची नोट मशिनमध्ये टाकताच रिचार्ज होत नसून पैसेही परत येत नसल्याने प्रवाशांकडून तिकीट खिडक्यांवरील रेल्वे कर्मचाऱ्यांना जाब विचारला जात आहे. प्रवाशांसोबत अशा बऱ्याच घटना घडत असून काही वेळेला तिकीट आणि रिचार्जही होत आहे. पण त्याचे प्रमाण कमी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ही मशिन ५ आणि १0 रुपयांची नाणी तसेच ५ रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतच्या महात्मा गांधीजींच्या सिरीजमधील नोटाच स्वीकारते. अशा येत्या काही महिन्यांत मध्य रेल्वेवर ११0 आणि पश्चिम रेल्वेवर ७0 मशिन बसवण्यात येणार आहेत.

स्मार्ट कार्ड रिचार्जचा प्रयत्न झाला अयशस्वी
जयंत बर्वे या प्रवाशासोबतही अशीच घटना मंगळवारी सीएसटी येथे घडली. स्मार्ट कार्डचे रिचार्ज करण्यासाठी त्यांनी १00 रुपयांची नोट मशिनमध्ये टाकली. रिचार्ज तर झालेच नाही आणि पैसेही परत आले नाहीत. त्यामुळे ही बाब त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून संबंधित कंपनीच्या इंजिनीअरशी संपर्क साधून पैसे परत मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते.

या मशिनमध्ये पैसे किंवा नोटा टाकूनही तिकीट न मिळण्याची
तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब संबंधित कंपनीला सांगण्यात आली असून त्यांच्याकडून तांत्रिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- उदय बोभाटे
(क्रिस- महाव्यवस्थापक)

Web Title: 'Took money by taking money'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.