जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मैदानातील अतिक्रमण न हटवल्यास अर्धनग्न ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या दि.मा. प्रभुदेसाई यांचे वृत्त लोकमतच्या शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे आणि पालिका विभाग कार्यालयाने तात्काळ बैठक घेत प्रभुदेसाई यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कुर्ला येथील खेळासाठी राखीव गांधी मैदानावरील अतिक्रमणे हटवावीत, या मागणीसाठी प्रभुदेसाई यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
मैदान वाचवण्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याचे आणि नियोजित आंदोलनाचे वृत्त ' मैदानातील गाळे तोडा; ९० वर्षांचा 'तरुण' मैदानात ' या शीर्षकाखाली लोकमतच्या १४ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत कुर्ला पोलिस ठाणे व पालिकेच्या 'एल' विभागाचे सहाय्यक मनपा आयुक्त यांच्या दालनात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभुदेसाई यांनाही बोलावले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत कुर्ल्यातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही अटोकाट प्रयत्न करीत आहोत, तरी त्यासाठी आम्हाला २८ डिसेंबर पर्यंत वेळ द्या, तुमचे आंदोलन सध्या स्थगित करा, अशी विनंती पोलीस ठाणे आणि पालिकेच्यावतीने करण्यात आली . त्यावर, मैदानाच्या कुंपणाची भिंत दोन दिवसांत बांधून द्या, अन्य मागण्या २८ डिसेंबर पर्यंत पूर्ण करा, त्या मान्य न झाल्यास ३१ डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभुदेसाई यांनी दिला.
आजच्या बैठकीत ठरलेले सगळे ठराव वृतांत लेखी स्वरूपात १८ डिसेंबर पर्यंत सादर करा, अशीही सुचना त्यांनी केली. त्यास एल विभाग व कुर्ला पोलिस ठाणे यांनी मान्यता दिली. त्यानंतर कुर्ल्यातील सर्व मंडळे, संस्था, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांची आंदोलनास सहकार्य, पाठिंबा व तयारी कारण्याकरिता प्रभुदेसाई यांच्या घरी आयोजित केलेली बैठक रद्द करण्यात आली, असे कुर्ल्याच्या गौरी शंकर क्रीडा मंडळातर्फे सांगण्यात आले.