दाताच्या दुखण्याचे प्रमाण पालिका शाळांत अधिक, दृष्टीदोषाचेही अधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:05 IST2025-01-22T11:04:45+5:302025-01-22T11:05:38+5:30
Mumbai News: महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सातत्याने आरोग्य तपासणी केली जात असून, मागील वर्षी तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात दंतविकार आणि दृष्टिदोषाने ग्रासल्याचे समोर आले आहे.

दाताच्या दुखण्याचे प्रमाण पालिका शाळांत अधिक, दृष्टीदोषाचेही अधिक रुग्ण
मुंबई - महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सातत्याने आरोग्य तपासणी केली जात असून, मागील वर्षी तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात दंतविकार आणि दृष्टिदोषाने ग्रासल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी तपासणीअंती हृदयरोगग्रस्त ७ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अन्य ११४ जणांवर विविध शस्त्रक्रिया झाल्याची माहिती शिक्षण आरोग्य विभागाने दिली.
याबाबत विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. धीरज पगार यांनी सांगितले की, पालिकेतर्फे दहा शालेय चिकित्सालयांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आरोग्याची कशी काळजी घ्यावी, कशी निगा राखावी तसेच जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे कशा पद्धतीने आजार बळावू शकतात, याची माहिती दिली जाते. वर्षभरात ३,७६,७१९ मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या आहेत.
४ टक्के विद्यार्थी त्वचारोगाने त्रस्त
तपासणीनंतर १ लाख ४७ हजार १७१ विद्यार्थ्यांना विविध उपचार देण्यात आले. यामध्ये सर्वाधिक १६ टक्के विद्यार्थ्यांना दंतविकारावर उपचार देण्यात आले.
५.५ टक्के विद्यार्थ्यांना दृष्टिदोष तर त्वचारोग आणि अशक्तपणाची समस्यांनी प्रत्येकी ४ टक्के विद्यार्थी त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक टक्का विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना इतर विकार झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर उपचाराची सोयही पालिकेतर्फे करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना हर्निया, अपेंडिक्स, हाडाच्या समस्या असल्याचेही निदर्शनास आले आहे.