मुंबई : आजकालच्या मुलांना शिक्षणासाठी हाय-प्रोफाईल कॉलेज हवी असतात. आपण प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकतोय हीच त्यांच्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट असते. कॉलेजमध्ये भलामोठा कॅम्पस हवा, मोठ-मोठी लेक्चर हॉल हवीत, विविध सुविधा हव्यात अशी मोठ-मोठी अपेक्षांची लिस्ट आज-कालच्या तरुण मंडळींची असते. मुंबईतल्याच अशाच काही प्रसिद्ध कॉलेजविषयी आपण आज जाणून घेऊया.
रुपारेल कॉलेज, दादर
दक्षिण मुंबईत असलेलं हे सगळ्यात प्रसिद्ध कॉलेज. कॉलेजसमोरचा भव्य कॅम्पसच विद्यार्थ्यांना इकडे अॅडमिशन घ्यायला प्रोत्साहन करतो. तसंच कॉलेजकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांमुळेही विद्यार्थी आकर्षित होत असतात. कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स या तीनही शाखा इकडे असल्याने दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढत जाताना दिसते. या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचं म्हणजे तुमच्याकडे तसे मार्क्सही असायला हवेत. हुशार मुलांचं कॉलेज म्हणूनही या कॉलेजकडे पाह्यलं जातं. ऐश्वर्या रॉय, अजित आगरकर, सिद्धार्थ जाधव, सुरेश प्रभू अशी दिग्गज व्यक्तिमत्त्व या कॉलेजमधून शिकून गेली आहेत.
रुईया कॉलेज, माटुंगा
माटुंग्यात असलेलं रुईया कॉलेजही प्रतिष्ठेचं कॉलेज मानलं जातं. आर्ट्स आणि सायन्स या दोनच शाखा इकडे आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही या कॉलेजमधून आयोजित केले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलेलाही वाव मिळतो. शिक्षक प्रसारक मंडळी, पुणे यांनी माटुंग्यात १९३७ साली या कॉलेजची स्थापना केली. मुंबईतील हे पहिले प्रायव्हेट मॅनेजमेंट कॉलेज आहे. तसंच उत्कृष्ट कॉलेजची अनेक पुरस्कारही या कॉलेजला मिळालेली आहेत. अभिनेते दिलीप प्रभावळकर, शिल्पा तुळसकर, नंदू नाटेकर, अर्थशास्त्रज्ञ नरेंद्र जाधव अशी व्यक्तिमत्त्व या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.
पोद्दार कॉलेज, माटुंगा
रुईया कॉलेजच्या अगदी बाजूलाच असलेलं हे पोद्दार कॉलेज. १९४१ सालापासून हे कॉलेज मुंबईत असून केवळ कॉमर्स शाखेचंच शिक्षण उपलब्ध आहे. वाणिज्य शाखेतील इतर अनेक कोर्सेस इकडे उपलब्ध आहेत. नुकतंच या महाविद्यालयाला नॅकचा ए ग्रेड मिळालाय. वाणिज्य शाखेत तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर पोद्दार कॉलेज सर्वोत्तम आहे. क्रिकेटर रवी शास्त्री, श्रेयस अय्यर, अभिनेता सनी देओल, शिल्पा शेट्टी अशी नामवंत लोकं या कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडली आहेत.
साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठ्ये महाविद्यालयात कॉमर्स, सायन्स आणि आर्ट्स अशा तिनही शाखा आहेत. १९५९ साली हे महाविद्यालय स्थापन झालं तेव्हा आर्ट्स आणि सायन्स या दोनच शाखा इकडे होत्या. कालांतराने १९८२ साली कॉमर्स शाखेचाही अभ्यास सुरू करण्यात आला. हे कॉलेज विलेपार्ल्यात असल्याने सुरुवातीला पार्ले कॉलेज म्हणूनच ओळखळं जायंचं. कालांतराने १९९३ साली साठ्ये कॉलेज असं नामांतरण करण्यात आलं. सांस्कृतिक विभागासोबतच, मास कम्युनिकेशनसाठीही हे महाविद्यालय प्रसिद्ध आहे.
डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले
विलेपार्ल्यात साठ्ये महाविद्यालयाच्या अगदी समोरच असलेलं कॉलेज म्हणजे डहाणुकर कॉलेज. एम.एल डहाणूकर या महाविद्यालयाला नुकताच नॅकचा ए ग्रेड मिळालाय. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनमार्फतच १९६० साली या कॉलेजची स्थापना झाली. कॉलेजसाठी एम.एल.डहाणूकर या उद्योजकांनी मोठी मदत केली. त्यामुळे महाविद्यालयाला त्यांचं नाव देण्यात आलं. हे महाविद्यालय एकांकिका स्पर्धांमुळेही नेहमी गाजतं. अनेक कलाकार या महाविद्यालयाने घडवले आहेत. अभिनेता प्रथमेथ परब आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही दोघंही या महाविद्यालयातील आहेत.
महर्षी दयानंद महाविद्यालय, परळ
परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालय म्हणजेच एम.डी. कॉलेज गिरणगावातील विद्यार्थ्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. या महाविद्यालयालाही यावर्षीचा नॅकचा ए ग्रेड मिळालाय. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या शाखांव्यतिरिक्त अनेक कोर्सेसही इकडे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ देण्यासाठी हे कॉलेज महत्त्वाचं मानलं जातं. अनेक विद्यार्थी थिएटर शिकण्यासाठी एम.डी. कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतात, कारण येथील नाट्यविभाग अशा होतकरू कलावंतांना नेहमीच बळ देतं. त्यामुळे या महाविद्यालयातून अनेक कलावंतही घडले आहे. अभिनेता भरत जाधव, ऋतुजा बागवे, प्रल्हाद कुडतरकर अशी अनेक कलावंत या कॉलेजने दिली आहेत. अनेक टीव्ही सिरिअलमध्ये या कॉलेजमधील अनेक कलाकार दिसतात.
सेंट झेव्हियर्स कॉलेज, सीएसटी
मुंबईतलं एक प्रतिष्ठेचं कॉलेज म्हणजे सेंट झेव्हियर्स कॉलेज. या कॉलेजचे फेस्टिव्हल्सही मुंबईतल्या विद्यार्थ्यांमध्ये फार प्रसिद्ध आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सीएसटी स्थानकाजवळच हे कॉलेज असल्याने जवळपास अनेक छान फिरण्यासारखी ठिकाणं आहेत. त्यामुळे विद्यार्थी हमखास या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळावं म्हणून प्रयत्न करत असतात. इंडिया टुडे नीलसन भारतच्या बेस्ट कॉलेज सर्वेक्षणात मुंबईतील टॉप कॉलेजमध्या सेंट झेव्हियर्स कॉलेजला पाचवं स्थान मिळालं होतं. लायब्ररी, लॅब, कँटीन, हॉस्टेल, जिम, स्पोर्ट्स, प्लेसमेंट सेल अश्या विविध सुविधा इकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे दुरून विद्यार्थी इकडे शिकायला येत असतात. पत्रकार राजदीप सरदेसाई, अभिनेत्री विद्या बालन, शबाना आझमी, पत्रकार शोभा डे, निरजा भानोत, आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, तब्बू, अशोक कामटे, आदित्य ठाकरे, सुनिल गावसकर, झाकिर हुसैन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी या कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे.