शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर होणार चर्चा, कायदा चर्चेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:11 AM2018-02-05T04:11:53+5:302018-02-05T04:12:00+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा १० व ११ फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे १२वे द्वैवार्षिक अधिवेशन यंदा १० व ११ फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडणार आहे. या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा होणार असून कंपनी कायदा, सातवा वेतन आयोग व इतर शैक्षणिक प्रश्नांबाबत चर्चा होईल, अशी माहिती अधिवेशन प्रमुख अनिल बोरनारे यांनी दिली.
बोरनारे म्हणाले की, दहिसर पूर्वेकडील स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटरमध्ये हे दोन दिवसीय अधिवेश पार पडेल. त्यात राज्यातील नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोकण व मुंबई विभागातील शिक्षक परिषदेचे शेकडो पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्ते उपस्थित राहतील. शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे करतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गोपाळ शेट्टी व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे संघटनमंत्री महेंद्र कपूर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशन संयोजक शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, उद्घाटन सत्राचे अध्यक्ष शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू असतील. या सत्रात मुंबई विभागातील शिक्षक परिषदेच्या कार्यावर अनिल बोरनारे, तर शिक्षकांकडून व कार्यकर्त्यांकडून अपेक्षा यावर मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर मार्गदर्शन करतील. दुपारी ३ वाजता शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगावर परिसंवाद होईल. त्यात शिक्षक परिषदेचे सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सतीश नाडगौडा सहभागी होतील.