Join us

तोरडमल मामांची नाट्यशाळा हाच मोठा नाट्यप्रयोग...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:06 AM

------------------प्रा. मधुकर तोरडमल म्हणजेच, मामांनी माझ्यावर आणि मी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मामांच्या नाट्यशाळेत दाखल होणे हा माझ्या ...

------------------

प्रा. मधुकर तोरडमल म्हणजेच, मामांनी माझ्यावर आणि मी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. मामांच्या नाट्यशाळेत दाखल होणे हा माझ्या आयुष्यातील मोठा नाट्ययोग ठरला. मामांची ही नुसती नाट्यशाळा नव्हती, तर ते विद्यालयच होते आणि अनेक शोधनिबंध लेखकांचे ते मार्गदर्शन केंद्रही होते.

मामांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांत मी विविध भूमिका केल्या; पण महत्त्वपूर्ण अशी भूमिका मिळाली नाही. ‘तरुण तुर्क’मधील प्यारेलाल हा एकमेव अपवाद! पण ‘अखेरचा सवाल’ या नाटकापासून एक मात्र झाले. मामांनी लिहिलेल्या प्रत्येक नाटकाच्या वाचनाला त्यांनी मला बोलवायला सुरुवात केली. मला एखादी चांगली भूमिका देता आली नाही, याची त्यांना कदाचित खंतही वाटली असावी; पण ‘बाप बिलंदर बेटा कलंदर’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकांची पुनर्निर्मिती करण्याची त्यांनी मला परवानगी दिली.

‘तरुण तुर्क’चा पाच हजारावा प्रयोग करण्याचे भाग्य मला लाभले. प्रकृती बरी नसतानाही ते त्याला हजर राहिले होते. प्रमोद पवार, राजन पाटील, अशा काही निवडक मंडळींतच ते रमायचे. स्तुतिपाठकांचा घोळका त्यांनी कधीच गोळा केला नाही.

ते जायच्या आदल्या दिवशी मी त्यांना पाहायला गेलो होतो. कारण आता बोलणे संपले होते. नुसती घरघर सुरू होती. मी त्यांच्या उशाशी बसलो होतो. मला सारखे वाटत होते की, मामांची ही अवस्था आपण या आधी अनुभवली आहे. मग अचानक आठवले की, ‘मृगतृष्णा’ नाटकात आपला मुलगा येईल, मांडी देईल व गंगाजल आपल्या मुखात घालेल म्हणून जीव जागता ठेवण्याचा अट्टहास करणारे शास्त्रीबुवा ते हेच!

मी मनातल्या मनात मामांना व त्यांच्या प्रतिभेला नमस्कार केला आणि त्यांच्या घरातून बाहेर पडलो. ती मामांची आणि माझी शेवटची भेट. ते गेले, तेव्हा मी बारामतीला प्रयोगासाठी गेलो होतो. परतीचा प्रवास सुरू असतानाच दिलीप भोसलेचा निरोप पोचला की ‘मामा इज नो मोअर.’ माझे वडील गेले, त्यावेळीही मी त्यांच्याजवळ नव्हतो; पण त्यांचे अंत्यसंस्कार आटोपून नाशिकहून मुंबईला येताना माझ्याबरोबर साक्षात मामा तोरडमल होते; परंतु आता मात्र मी खऱ्या अर्थाने एकटा होतो.

-शब्दांकन : राज चिंचणकर

सोबत : मधुकर तोरडमल व उपेंद्र दाते यांचे फोटो.