मुंबई : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, शुक्रवारी पहाटेपासून मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला. पूर्व आणि पश्चिम उपनगरासह शहरात सुरू झालेल्या पावसाने दुपारपर्यंत जोर कायम ठेवला. त्याचवेळी ४ जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिकसह पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याव्यतिरिक्त ५ आणि ६ जुलै रोजी पालघरला आॅरेंज अलर्ट (कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते) असून,येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाचा जोर पहाटे वाढला. विशेषत: सकाळी ८ ते दुपारी १२ या काळात तो मुसळधार कोसळला. सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांत मुंबईत १५६ मिमी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे मुंबईत एकूण ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. २४ ठिकाणी झाडे पडली. ९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.ठाणे, नवी मुंबई, पनवेलला झोडपलेठाणे/नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यात १०९.३४ मिमी पाऊस पडला. तर ठाणे परिसरात सायंकाळपर्यंत ८२.५४ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस उल्हासनगर शहर परिसरात पडला. नवी मुंंबईला शुक्रवारी पहाटेपासून पावसाने झोडपले. सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पाणी साचले होते. रायगडमध्ये पाऊस पडल्याने आनंदाचे वातावरण होते.
'सखल भागात पाणी साचले; वाहतूक मंदावलीदादर येथील हिंदमाता आणि गांधी मार्केटसह मुंबईतल्या सखल भागांत नेहमीप्रमाणे पावसाचे पाणी साचल्याने शुक्रवारी येथील वाहतूक ठप्प झाली होती. तर उर्वरित ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी पावसाचा वेग व मारा कायम राहिल्याने मुंबईचा वेग नेहमीच्या तुलनेत मंदावला.