टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 07:10 IST2025-01-09T07:09:47+5:302025-01-09T07:10:34+5:30

रात्री गुंतवणूक, दुसऱ्या दिवशी पैसे गायब! मुंब्र्यातील २३ वर्षीय तरुणाची व्यथा

Torres fraud in abroad too! Dadar office raided today three bank accounts frozen | टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली

टोरेसचा परदेशातही गंडा! दादरच्या कार्यालयाची आज झाडाझडती, तीन बँक खाती गोठवली

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : टोरेस ज्वेलरी ब्रँडच्या घोटाळ्याचा तपास बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानुसार, एक पथक गुंतवणूकदारांचे तक्रारअर्ज स्वीकारत  आहे, तर दुसरे पथक फसवणुकीचा तपास करत आहे. आतापर्यंत टोरेसची तीन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. कंपनीच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची कुंडलीही तपासण्यात येत आहे. या टोळीने अशाच प्रकारे परदेशातही अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती पुढे येत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टोरेस ब्रँडच्या गोठवलेल्या खात्यांत कोट्यवधी रुपये असल्याचे समजते. तसेच गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कंपनीच्या दादरच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यास सुरुवात करणार आहे. 

कंपनीचे संस्थापक परदेशी

प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या टोरेस ब्रँडमधील फसवणुकीप्रकरणी जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे आणि रशियन भारतीय नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांना अटक केली आहे.

तानिया (५२) पाच वर्षांपासून कुलाबा परिसरात राहायची. तर वॅलेंटिना (४४) १५ वर्षांपासून डोंबिवली परिसरात राहते. दोघींचे दोन लग्न झाले आहे. जॉर्न कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालेंको हे कंपनीचे संस्थापक आहेत. व्हीकटोरीया ही युक्रेनची नागरिक असल्याची, तर कार्टर आणि तौफिक रियाज ही एकच व्यक्ती आहे. 

टोरेसला अलर्ट... अन पोस्टही

  • अभिषेक गुप्ताला शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणल्यानंतर टोरेसच्या इन्स्टाग्रामवरील खात्यावर अवघ्या काही मिनिटांत त्याचा पोलीस ठाण्यातील व्हिडीओ शेअर करण्यात आला. त्यात अभिषेक पोलिसांना गिफ्ट घेऊन आल्याचे म्हटले आहे.
  • तसेच जास्तीतजास्त जणांनी पोलीस ठाण्याबाहेर जमण्याचे आवाहन करण्याबरोबरच ही पोस्ट व्हायरल करण्याच्या सूचनाही त्यात दिल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना ही माहिती कशी आणि कुठून मिळते? हाही चौकशीचा भाग आहे. याबाबत सायबर पोलिसांचे विशेष पथक काम करत आहे.


रात्री गुंतवणूक, दुसऱ्या दिवशी पैसे गायब ! मुंब्र्यातील २३ वर्षीय तरुणाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत १५०० हून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. यात आदल्या रात्री गुंतवणूक करत दुसऱ्या दिवशी थेट बंद झाल्याच्या माहितीने धक्का बसल्याचे मुंब्रा येथून आलेल्या तरुणाने सांगितले. 

मुंब्रा येथून आलेला २३ वर्षीय तरुण खासगी क्षेत्रात नोकरी करतो. ५ जानेवारीपर्यंत गुंतवणूक केल्यास थेट साडेअकरा टक्क्यांनी पैसे मिळणार असल्याच्या ऑफरने त्याने बँक खात्यातील ७५ हजारांची जमापुंजी गुंतवली. आठवड्याला येणाऱ्या नफ्याचे स्वप्न रंगविण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी त्याला मालक पैसे घेऊन पसार झाल्याचे समजताच धक्का बसल्याचे त्याने सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या माहीमच्या श्वेतांश गायकवाडने दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील सिनियरकडून ऑफरबद्दल समजले.

तो असा फसला... मित्राला येणारे लाखो रुपये

  • पाहून गुंतवणूक करण्याचे मुंब्रा येथील तरुणाने ठरवले. वडिलांकडे बऱ्याच वर्षांपासून हट्ट करून महागडा फोन घेण्यासाठी ६० हजार रुपये मिळाले होते. आठवड्यात कॉलेजची ट्रिप जाणार होती.
  • गुंतवलेल्या पैशांतून आणखीन महागडा फोन तसेच ट्रिपला जाण्याचा विचार करत त्याने ६० हजार रुपये गुंतवले. याबाबत वडिलांना सांगितले नाही.
  • ५ तारखेला हप्ता येणार होता. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशी हा घोटाळा समोर येताच वडिलांना सांगून पोलिस ठाण्यात आल्याचे त्याने सांगितले. तसेच भविष्यात अशा योजनांपासून लांब राहणेच बरे, असेही तो म्हणाला.


टोरेसचे आणखी ७ कोटी ४७ लाख रुपये गोठवले; भाईंदरच्या नवघर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क , मीरा रोड : मीरा रोडच्या रामदेव पार्क भागातील टोरेस ज्वेलरी फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कंपनीचे आणखी एक बँक खाते शोधून त्यातील ७ कोटी ४७ लाखांची रक्कम गोठवली आहे. यात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढून ५२वर गेली असून, रोज फसलेले लोक पोलिस ठाण्यात येत आहेत. फसवणुकीची नेमकी रक्कम अजून स्पष्ट झाली नसली तरी ती कोटींच्या घरात असू शकते.

रामदेव पार्कच्या अनंता एक्झोरिया इमारतीत भाड्याने उघडलेले टोरेस ज्वेलरी हे शोरूम सोमवारपासून बंद आहे. फसवणूक झालेल्या २८ जणांच्या तक्रारीनुसार सोमवारी रात्रीच नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.  गुन्ह्यातील चार आरोपींपैकी व्हिक्टोरिया कोवालेंको व ओलेना स्टोएन हे युक्रेनचे असून, ते मीरा रोडमध्ये कधी आलेच नसल्याचे सांगितले जाते. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ६८ लाख ११ हजार रुपये इतकी होती. 

आता तक्रारदारांची संख्या ५२ इतकी झाली असून, फसवणुकीच्या रकमेत सुमारे २० लाखांची वाढ झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धीरज कोळी यांनी सांगितले. मोजोनाइट स्टोन कित्येक पटीने महाग विकून तो खरेदी केल्यास दर आठवड्याला ९ टक्के बोनस व चांदीचे दागिने खरेदी केल्यास ४ टक्के, सोन्याचे दागिने खरेदी केल्यास २ टक्के परतावा देण्याचे आमिष लोकांना दाखवले. गुंतवणुकीसाठी विविध मार्ग अवलंबले जायचे.

पोलिसांनीही केली होती गुंतवणूक

  • वर्दळीच्या भागात इतके मोठे आलिशान ज्वेलरी शोरूम चालत होते. बक्कळ मोबदला मिळत असल्याने त्यात येणाऱ्यांची गर्दी असायची. सामान्यवर्गातील लोक जास्त यायचे. त्यात स्टोन खरेदी केला की, त्याचे जीएसटीसह बिल दिले जायचे. 
  • लोकांना अव्यवहार्य परताव्याचे आमिष दाखवण्यासह तसे पैसेही अनेकांना दिले जात असताना याबाबत पोलिस यंत्रणेला अजिबात कल्पना नव्हती का? असा सवालही आता केला जात आहे. यात गुंतवणूक केलेल्यांमध्ये  पोलिस कर्मचारी असल्याचीही चर्चा होत आहे.

Web Title: Torres fraud in abroad too! Dadar office raided today three bank accounts frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.