टोरेस फसवणूक १६३ कोटींची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विधानसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 06:23 IST2025-03-05T06:22:16+5:302025-03-05T06:23:14+5:30
१३ आरोपींना अटक झाली आहे. ९ वॉण्टेड आरोपींविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या झडतींमध्ये रोख ६ कोटी ७७ लाख रुपये मिळाले.

टोरेस फसवणूक १६३ कोटींची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विधानसभेत माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : टोरेस हा ज्वेलरी ब्रॅण्ड चालविणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रा. लि. या कंपनीने १५,६४६ गुंतवणूकदारांची १६३ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
भाजपचे अमित साटम आणि अन्य सदस्यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. फडणवीस यांनी त्यावर सांगितले की, राज्यात आणि विशेषतः मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी ६ ते ११ टक्के परतावा दर आठवड्याला देण्याचे आमिष देत फसवणूक करण्यात आली.
डायमंड आणि इतर ज्वेलरीमध्ये गुंतवणूक केल्यास दर आठवड्याला २ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिषही कंपनीने दाखविले होते. त्याला बळी पडून काही गुंतवणूकदारांनी स्वत: सहभागी होत नातेवाईक आणि मित्रांनादेखील साखळीमध्ये जोडले. आतापर्यंत मुंबईत दाखल गुन्ह्यांबाबत ७, एपीएमसी पोलिस ठाणे, नवी मुंबई येथे ३, तर नवघर पोलिस ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार येथे तीन अशा १३ आरोपींना अटक झाली आहे.
नऊ वॉण्टेड आरोपींविरुद्ध लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या झडतींमध्ये रोख ६ कोटी ७७ लाख रुपये मिळाले. वेगवेगळ्या बँक खात्यातील १८.४७ कोटी रुपये इतकी रक्कम गोठविण्यात आली आहे.
रक्कमही गोठवली
नवी मुंबईतील शोरूममधून १ कोटी ८९ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. नवघरच्या शोरूममधून आणि दोन बँक खात्यातून १० कोटी ६९ लाख रुपये इतकी रक्कम गोठविण्यात आली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून कंपनीमधून रोख रक्कम, सोने, हिरे व चांदीचे दागिने आणि बँक खात्यातील रकमांसह १५ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.