Join us

Torres Scam: वर्षभरात 13 कोटींची फसवणूक; टोरेसच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

By मनीषा म्हात्रे | Updated: January 6, 2025 20:29 IST

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपानुसार तब्बल १३ कोटींचा हा घोटाळा आहे.

Torres Scam News: मुंबई, नवी मुंबईतील टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर अचानक पैसे गुंतवलेल्या नागरिकांनी गर्दी केली. कंपनीच्या बंद कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर मोठा घोटाळा समोर आला. १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून असंख्य लोकांकडून पैसे गोळा करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता टोरेस कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टोरेस कंपनीने गुंतवणुकादारांकडून मोठा परतावा देण्याचा दावा करत पैसे जमा करून घेतले. काही हफ्ते दिल्यानंतर हफ्ते देणे बंद केले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मुंबई, मीरा भाईंदर, नवी मुंबईतील टोरेस कंपनीच्या कार्यालयांबाहेर आंदोलने केली. नवी मुंबईत तर कंपनीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 

टोरेस कंपनीच्या संचालक, मॅनेजरसह पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत १३ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप असून हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे गुंतवलेल्या लोकांनी काय सांगितलं?

आंदोलन करणाऱ्या गुंतवणूकदारांनी सांगितलं की, भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार, असे कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. गेल्या वर्षभरापासून ही कंपनी मुंबईत विविध ठिकाणी कार्यरत आहे आणि डिसेंबर महिन्यापर्यंत गुंतवणूकदारांना हप्ते मिळत होते. पण गेल्या दोन आठवड्यांपासून हप्ते मिळत नसल्याचं आंदोलक गुंतवणूकदारांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईधोकेबाजीगुन्हेगारीमुंबई पोलीस