टोरेस घोटाळा: ...अन् दादरच्या भाजी विक्रेत्या कुटुंबाने गमावले साडेचार कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 07:44 IST2025-01-08T07:44:19+5:302025-01-08T07:44:56+5:30
सहा टक्के परताव्याच्या प्रलोभनाला पडले बळी

टोरेस घोटाळा: ...अन् दादरच्या भाजी विक्रेत्या कुटुंबाने गमावले साडेचार कोटी रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दादर येथे भाजी विक्रेत्याच्या दुकानासमोरच टोरेसचे आलिशान कार्यालय उभे राहिले. आठवड्याला एक लाखावर पडून भाजी विक्रेत्याने स्वतः पैसे गुंतवले आणि कुटुंबीयांना भाग पाडले. अवघ्या सात महिन्यांत त्यांनी सर्वाधिक साडे चार कोटी गुंतवले. प्रदीपकुमार वैश्य (३१) असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
वैश्य यांच्या दुकानासमोरच गेल्या फेब्रुवारीत टोरेसची शाखा सुरू झाली. दुकानाच्या पाठीमागे राहणाऱ्या एका महिलेने, टोरेसमध्ये एक लाख रुपये गुंतविल्यास मोजोनाईट हिरा देऊन त्यावर दर आठवड्याला ६ टक्के व्याजाप्रमाणे ६ हजार रुपये ५२ आठवडे मिळतील, अशी ऑफर दिली. त्यावर इतरांप्रमाणे त्यांचाही विश्वास बसला. त्यांनीही २१ जूनला ६ लाख ७० हजार रुपये गुंतवले. त्यानुसार आठवड्याला ४० हजार २३३ रुपये मिळाले. दोन आठवड्यांत ८० हजार ४६६ रुपये मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. वैश्य यांनी स्वतः, त्यांची पत्नी, मेहुणा, मेहुणी, सासू, सासरे, साडू यांनी आणि त्यांच्या मित्र- मैत्रिणीनेही पैसे गुंतवले. वैश्य कुटुंबीयांनी टोरेसच्या प्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनीमध्ये ४ कोटी ५५ लाख ५ हजार ७३ रुपये गुंतवले होते.
वैश्य कुटुंबीयांनी दर आठवड्याला ६ टक्के प्रमाणे परतावा न घेता त्याची पुन्हा गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या ओळखीतील अन्य ३७ लोकांनी ८ कोटी ९३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. टोरेसकडून ३० डिसेंबरपासून परतावा येणे बंद झाले. वैश्य यांनी १ जानेवारीला दादर कार्यालयात चौकशी केली असता कंपनीच्या कर्मचाऱ्याने बँकेत टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याने दोन्ही आठवड्यांचा परतावा एकत्रित मिळणार असल्याचे सांगितले आणि त्यांना वाटेला लावले.
थेट कंपनीत धाव...
वैश्य यांनी ६ जानेवारीला सकाळी पुन्हा कंपनीचा सुपरवायझर अबरार शेखकडे चौकशी करताच, त्याने ‘भाई, कंपनीका इश्यू हो गया है, आप यहा आ जाओ,’ असे म्हणत कंपनीची जनरल मॅनेजर आणि स्टोअर इन्चार्ज यांच्याशी थेट बोलण्यास सांगितले. तेथे पोहोचताच नागरिकांची गर्दी दिसल्याने आपल्याला धक्का बसल्याचे वैश्य यांनी पोलिसांना सांगितले.