हुंड्यासाठी छळ; न्यायाधीश पत्नीचे मुख्य न्यायाधीशांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:44 AM2019-08-01T05:44:29+5:302019-08-01T05:44:32+5:30
चौकशीचे आदेश : कारसह ३० एकर जमिनीची मागणी केल्याचा आरोप
मुंबई : पती आणि सासरचे हुंड्यासाठी छळ करत आहेत, असे पत्र पुण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या एका न्यायाधीशाच्या पत्नीने मुख्य न्यायाधीशांना लिहिले आहे. मुख्य न्यायाधीशांनी याची दखल घेत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश रजिस्ट्रीला दिले आहेत.
२९ जुलै रोजी हे पत्र मुख्य न्या. प्रदीप नंद्राजोग यांना न्यायाधीशांच्या पत्नीने पाठविले. ३७ वर्षीय पत्नीने पत्राद्वारे आपल्या पतीची चौकशी करण्याची विनंती मुख्य न्यायाधीशांना केली आहे. तक्रारदार महिलेचे आणि न्यायाधीशांचे ८ मे २००७ रोजी लग्न झाले. सध्या हे न्यायाधीश पुण्यातील बारामती येथे कार्यरत आहेत. ‘माझ्या विवाहानंतर माझे पती आणि सासरचे हुंड्यासाठी माझा छळ करू लागले. विवाहात त्यांना
हुंडा म्हणून पाच लाख रुपये, फर्निचर आणि विवाहाचा संपूर्ण खर्च माहेरच्यांनी दिला. तरीही त्यांची हाव संपली नाही. त्यांनी माझ्याकडून कार आणि ३० एकर जमीन मागण्यास सुरुवात केली,’ असे तक्रारदार महिलेने पत्रात म्हटले आहे.
२००८ मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावावर असलेली जमीन न्यायाधीश पतीच्या नावावर करण्यासाठी सासरच्यांनी दबाव आणला. तसे करण्यास नकार दिल्यावर माझ्या पतीने आणि सासरच्यांनी मला मारझोड करून घराबाहेर काढले, असा दावा पत्राद्वारे करण्यात आला आहे. त्यानंतर काही काळ लातूर येथे आईच्या घरी काढला. पुन्हा पतीची बदली झालेल्या ठिकाणी गेले असता त्यांनी त्या घरातूनही बाहेर काढले, असे पत्रात नमूद आहे.
‘पोलिसांनी दिला माहेरी जाण्याचा सल्ला’
अखेर छळाला कंटाळून ४ जुलै २०१२ रोजी पती व सासरच्यांविरुद्ध पोलीस तक्रार केली. परंतु, पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. उलट मलाच माझ्या माहेरी जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी देखभालीचा खर्च मिळावा, यासाठी अकोला कुटुंब न्यायालयात अर्ज केला. माझा पती न्यायाधीश असून ते आणि त्यांचे कुटुंब अजूनही मला हुंड्यासाठी छळत आहेत, असे न्यायाधीशांच्या पत्नीने पत्रात म्हटले आहे.