मुलींवर अत्याचार : सुरक्षारक्षक अटकेत
By admin | Published: April 8, 2015 12:24 AM2015-04-08T00:24:42+5:302015-04-08T00:24:42+5:30
टीव्ही पहाण्याच्या बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींना घरात बोलवून त्यांच्यावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार करणाऱ्या छता इंदुलकर
ठाणे : टीव्ही पहाण्याच्या बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींना घरात बोलवून त्यांच्यावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार करणाऱ्या छता इंदुलकर या सुरक्षा रक्षकास कापूरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने कोलशेत वरचा गाव परिसरात मंगळवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सुरक्षा रक्षकाने ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास टीव्ही दाखविण्याच्या बहाण्याने दोघी बहिणींपैकी ११ वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्याशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड करुन त्याला चावा घेऊन मोठया धाडसाने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेतली. मात्र, भीतीपोटी तिने हा प्रकार घरात सांगितलाच नाही. याचाच गैरफायदा घेऊन त्याने तिला ६ एप्रिल रोजी लिंबू आणायला सांगितले. तिने नकार दिल्यावर त्याने तिला धमकावून हे काम करण्यास भाग पाडले. लिंबू द्यायला जातांना तिने शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षीय मुलीला ती बरोबर घेऊन गेली. तेंव्हाही घराचा दरवाजा लावून पुन्हा चाकूच्या धाकाने ‘तसाच’ प्रकार करण्यासाठी तो सरसावला. मोठया मुलीने त्याच्या तावडीतून पुन्हा सुटका केली. मात्र लहान मुलीला पकडून तिच्याशी त्यांने लैंगिक चाळे केले. तरीही भीतीपोटी या मुलींनी घरी काहीच सांगितले नाही. दरम्यान, लहान मुलीला प्रचंड वेदना होऊ लागल्यानंतर आईने तिला विश्वासात घेतल्यावर हा प्रकार उघड झाला. तेव्हा दोघींनी झाल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर रहिवाशांनी त्याला पकडले. कापूरबावडी पोलीस ठाण्यात त्याला बीट मार्शलच्या मदतीने आणल्यानंतर पोलीसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्याला ७ एप्रिल रोजी रात्री १२.३० वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग, अपहरण करणे आणि लैंगिक अपराधाबाबत बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्याला १३ एप्रिलपर्यंन्त पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त व्ही. बी. चंदनशीवे यांनी दिली. (प्रतिनिधी)