लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: खोट्या ट्वीटने तीन विमानांची उड्डाणे थांबविणाऱ्या छत्तीसगडमधील अल्पवयीन मुलाने डोंगरीच्या बाल सुधारगृहात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. मात्र, खोट्या ट्वीट प्रकरणातील कारवाईतून वाचण्यासाठी मुलाने बनाव केल्याचा संशय असून, डोंगरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
फैजलुद्दीन निब्रान नावाच्या व्यक्तीने हा संदेश पाठविल्याचे भासवण्यात आले होते. पोलिस तपासात छत्तीसगढमधील या मुलाचे हे धक्कादायक कारनामे समोर आले. तो १७ वर्षे ११ महिन्यांचा असल्याने सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात करण्यात केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, सोमवारी सकाळी ९ वाजता या मुलाने बॅरेकच्या टॉयलेटमध्ये तेथीलच मुलाने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप केला. याप्रकरणी डोंगरी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. याप्रकरणी बॅरेकमध्ये असलेल्या इतर ८ ते १० मुलांचेदेखील जबाब नोंदविण्यात येत आहे.
असा केला कारनामा
अकरावीत शिकणाऱ्या या मुलाने मित्रासोबत मोबाइलचा व्यवसाय सुरू केला होता. तो व्यवसाय बंद झाल्याने मित्राला तीन लाख रुपये देणे शिल्लक होते. त्या रागातून मित्राला अडकविण्यासाठी त्याने थेट मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या तीन विमानांमध्ये सहा किलो आरडीएक्ससह सहा दहशतवादी शिरल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकली होती. त्यामुळे इंडिगोची दोन विमाने, न्यूयॉर्कला जाणारे एक विमान थांबवण्यात आले होते.
यापूर्वीही केलेल्या खोट्या तक्रारी
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलगा खोट्या तक्रारी करण्यात माहीर आहे. यापूर्वीदेखील त्याने छतीसगडमध्ये अशाच प्रकारे दोन तक्रारी केल्या. वैद्यकीय अहवालातून नेमके कारण स्पष्ट होईल. कारवाईतून सुटका करण्यासाठी त्याने हा आरोप केल्याचा संशय असून, त्यानुसार तपास सुरू आहे.