मुंबई - कुलाबा पोलिसांनी सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाला गरोदर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी आणि या मारहाणीत पोटातील बाळ दगावल्याने अटक केली आहे. ११ आठवड्यांच्या गरोदर पत्नीला बाळाला जन्म देऊ नये म्हणून या अटक वकिलाने मारहाण केली.
पत्नीच्या तक्रारीनंतर, गरोदर पत्नीला मारहाण करणाऱ्या निर्दयी वकिलाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. मारहाणीमुळे या महिलेचा गर्भपात झाला असून तिने तिच्या पतीविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. कुलाबा पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३१५, ३२४, ५०४ आणि ५०६ अन्वये वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनुसार तिच्य पतीला मृतात्म्यांशी बोलण्याची सवय आहे व त्या आत्म्यांच्या सांगण्यावरूनच तो तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र, तिने गर्भपातास नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करून तिचा गर्भपात घडवून आणला. बायकोला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, तिचा त्याला विरोध होता. त्यानंतरही तो तिला गर्भपात करण्यासाठी सतत धमकावत होता. मात्र, ती ऐकत नसल्याने एकदा त्याने तिला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर ती तात्काळ नवी दिल्लीला तिच्या माहेरी निघून गेली. मात्र, तिथे गेल्यानंतर तिला रक्तस्त्राव होऊ लागल्याने डॉक्टरांना तिचा गर्भपात करावा लागला. नंतर हि महिला आता मुंबईत परतली असून तिने तिच्या नवऱ्याविरोधात कुलााबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आम्ही वकिलाला अटक केली असून त्याच्याविरोधात मारहाण करणे, जन्माआधीच गर्भातील बाळाची हत्या करणे असे गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी दिली.