पोलीस दलातील तब्बल १३ हजार पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:32 AM2019-07-15T06:32:04+5:302019-07-15T06:32:21+5:30
सक्षमीकरण व आधुनिकीकरणासाठी राज्य सरकार आग्रही असल्याचा दावा राज्यकर्ते व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात असला, तरी मंजूर पदे भरण्याबाबत उदासीन असल्याची वस्तुस्थिती आहे
- जमीर काझी
मुंबई : पोलिसांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणासाठी राज्य सरकार आग्रही असल्याचा दावा राज्यकर्ते व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात असला, तरी मंजूर पदे भरण्याबाबत उदासीन असल्याची वस्तुस्थिती आहे. राज्यातील शिपायापासून ते विशेष महानिरीक्षक/सहआयुक्त दर्जापर्यंतची तब्बल १२ हजार ९५९ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, बंदोबस्तांचा सर्वाधिक ताण सहन करीत असलेल्या कॉन्स्टेबल ते उपनिरीक्षकापर्यंतची १० हजार ७३२ जागा रिकाम्या असल्याची कबुली दस्तरखुद्द पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे.
सद्यस्थितीत महासंचालक व अप्पर महासंचालकांच्या पूर्ण जागा भरलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त प्रत्येक पदावरील जागा मोकळ्या आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर पदाबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीतून ही आकडेवारी पुढे आली आहे. ३० मेपर्यंतच्या रिक्त जागाची संख्या आहे. त्यानंतर, गेल्या दोन महिन्यांत आणखी ५ टक्के अधिकारी,अंमलदार सेवानिवृत्त झाली असल्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. महाराष्टÑ पोलीस दलात शिपायापासून ते महासंचालक दर्जापर्यंत एकूण २ लाख २० हजार ४१८ पदांना मंजुरी आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा सर्वाधिक तळाचे घटक असलेल्या शिपाई (९६,२४०), हवालदार (४२,९६४) आणि नाईक (४१,४३५) पदे आहेत. मात्र, सेवाज्येष्ठता व भरतीतील अनियमितता व सेवाज्येष्ठतेच्या आधारे दिल्या जाणाºया पदोन्नतीमध्ये दप्तर दिरंगाईमुळे ही पूर्ण पदे भरलेली नाहीत. उपरोक्त तीन दर्जाची अनुक्रमे २,९३५, २,७३२ आणि १,०८० पदे रिक्त आहेत.
>पोलिसांवर पडतोय रिक्त पदांचा अतिरिक्त ताण
पोलीस दलातील मंजूर पदे भरण्यात होत असलेल्या दिरंगाईचा फटका उपलब्ध मनुष्यबळावर होत आहे. त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार सोपविला जात असल्याने त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्याचबरोबर, पोलिसांवर मानसिक व शारीरिक परिणाम होत आहे.
म्हणे पदे भरण्याची कार्यवाही सुरू
खात्यातील मंजूर पदे भरण्यात होणाºया दिरंगाईबाबत प्रशासनाकडून संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सुरू आहे, असा मोघम खुलासा जनमाहिती अधिकाºयांकडून करण्यात आला आहे.
>पीएसआयची २,३५१ व एपीआयच्या १,६३४ जागा भरलेल्या नाहीत, तर निरीक्षक व उपअधीक्षक/
सहायक आयुक्त दर्जाची अनुक्रमे १५७ व १७७ पदे रिक्त असल्याचे जनमाहिती अधिकाºयाने कळविले आहे.
त्याशिवाय आयजी (१२), डीआयजी (७) व उपायुक्त /अधीक्षकांची (१७) जागा रिक्त आहेत.
>पोलिसांचे पदनिहाय मनुष्यबळ
पद मंजूर कार्यरत रिक्त
महासंचालक ८ ८ -
अप्पर महासंचालक ३२ ३२ -
विशेष महानिरीक्षक ४४ ३३ १२
उपमहानिरीक्षक/ ४१ ३४ ७
अप्पर आयुक्त
उपायुक्त/अधीक्षक/ ३२६ ३०९ १७
अप्पर अधीक्षक
उपअधीक्षक ७७२ ५९५ १७७
निरीक्षक ४००५ ३८४८ १५७
सहायक निरीक्षक ४५५८ २९२४ १६३४
उपनिरीक्षक ११,०९५ ८,७४४ २३५१
सहायक फौजदार १८,८०४ १७,०६१ १७४३
हवालदार ४२,९६४ ४०,२१४ २७३२
नाईक ४१,४३५ ४०,३५५ १०८०
शिपाई ९६,२४० ९३,३०५ २९३५
एकूण २२०४१८ २०७४५९ १२९५९