Join us

वर्षभरात तयार होणार ६,६०० अग्नी स्वयंसेवक

By admin | Published: August 17, 2015 1:12 AM

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्राथमिक बचावकार्यास सुरुवात व्हावी या उद्देशाने अग्निशमन दलातर्फे ६,६०० अग्नी

मुंबई : एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्राथमिक बचावकार्यास सुरुवात व्हावी या उद्देशाने अग्निशमन दलातर्फे ६,६०० अग्नी स्वयंसेवकांची फौज तयार करण्यात येणार आहे. अग्निशमन दलाची ९० मीटर उंचीची हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म स्नॉर्केल (शिडी) रविवारी मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली. यानिमित्ताने भायखळा अग्निशमन मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अग्निसेवक उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर, आयुक्त अजय मेहता उपस्थित होते.शहरातील सोसायट्या, स्वयंसेवी संस्था यामधून अग्नी स्वयंसेवक उपक्रमासाठी कार्यकर्त्यांची निवड करून त्यांना बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईत एकूण ३३ अग्निशमन केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रासाठी २०० अग्निसेवक तयार करण्यात येणार आहेत. त्यांना प्रमाणपत्र व बिल्ला (बॅज) देण्यात येईल. अशा सर्व स्वयंसेवकांची माहिती, दूरध्वनी क्रमांकासह नियंत्रण कक्षामध्ये उपलब्ध असेल. अग्निशमन दलाची सेवा अग्रगण्य ठरावी म्हणून ३ बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. एक म्हणजे आगीच्या दुर्घटनांप्रसंगी नागरिकांनी काय करावे, काय करू नये या प्रकारच्या मार्गदर्शनपर सूचना देणारी भित्तिपत्रके नव्या स्वरूपात प्रदर्शित करण्यात येत आहेत. नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दुसरे म्हणजे अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जागतिक सर्वोत्तम दर्जाचे गणवेश व साहित्य पुरविणे इत्यादी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तिसरी बाब म्हणजे लहान अग्निशमन केंद्राचे जाळे विणण्यात येत आहे. जेणेकरून दुर्घटनांप्रसंगी अग्निशमन दल पोहोचून प्राथमिक कार्यवाही सुरू करू शकेल, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले. (प्रतिनिधी)