राज्यातील बाधित चीनच्या बरोबरीने, एकूण रुग्णसंख्या ८२ हजार ९६८
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 06:49 AM2020-06-07T06:49:52+5:302020-06-07T06:50:03+5:30
राज्यात आतापर्यंत ३७ हजार ३९० जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या ४२ हजार ६०० सक्रिय रुग्ण असून, मुंबईत सर्वाधिक २५ हजार ९७४ बाधित आहेत
दिवसभरात १२० मृत्यू; मृत्यूदर निम्मा ठेवण्यात मात्र यश
मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात २,७३९ नवीन रुग्णांचे निदान होऊन कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ८२ हजार ९६८ झाली आहे. चीनमध्ये सध्या संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येची जवळपास बरोबरी झाल्याने चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार चीनमध्ये ८४,६२० रुग्ण आहेत; परंतु त्यांच्या तुलनेत मृत्यूदर निम्म्यावर ठेवण्यात राज्य सरकारला यश मिळाल्याचेही दिसून येत आहे.
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दोन टक्क्यांनी वाढले आहे. हे प्रमाण आता ४५.०६ टक्क्यांवर गेले असून, राज्याचा मृत्यूदर ३.५७ टक्के इतका झाला आहे. दिवसभरात १२० मृत्यू झाले असून, बळींचा आकडा २ हजार ९६९ झाला आहे. १२० मृत्यूंमध्ये ७८ पुरुष, ४२ महिला असून, मुंबईतील ५८, ठाणे १०, नवी मुंबई ६, उल्हासनगर ६, मीरा भाईंदर ५, वसई विरार १, भिवंडी ३, पालघर १, नाशिक ५, मालेगाव २, पुणे १०, सातारा ५, सोलापूर २, औरंगाबाद मनपा २, अकोला मनपा २ आणि अमरावतीमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात आतापर्यंत ३७ हजार ३९० जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या ४२ हजार ६०० सक्रिय रुग्ण असून, मुंबईत सर्वाधिक २५ हजार ९७४ बाधित आहेत
31-40 वयोगटातील अधिक रुग्ण
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, सध्या राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक ३१ ते ४० वयोगटातील कोरोना रुग्ण आहेत. या रुग्णांची संख्या ५१ हजार ८५१ इतकी आहे, तर त्याखालोखाल २१ ते ३० वयोगटात १५ हजार १२८ रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ४१ ते ५० वयोगटात १३ हजार ९५७ रुग्ण, तर ५१ ते ६० वयोगटात १३ हजार ५३ रुग्णांची नोंद आहे.