मुंबई : गेल्या वर्षात राज्यातील मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी न करता येत असल्याने विविध सवलती देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना नुतणीकरणासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. १ एप्रिल २०२० पासून सहा महिन्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याशिवाय ३० जून २०१७ व ३० जुलै २०१९ नुसार मासेमारीसाठी ठेक्याने दिलेल्या तलावांची चालु वर्षांची तलाव ठेका रक्कम व मत्स्य संचयनाची १० टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीज केंद्राची चालू वर्षांची भाडेपट्ट्याची रक्कम लॉकडाऊन कालावधीसाठी देण्यात येत असल्यास सदरची भाडेपट्टा रक्कम भरणा करण्यासाठी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धनासाठी १ टक्का अर्धा टक्का क्षेत्र ठेक्याने दिलेल्या क्षेत्रांची ठेका रक्कम लॉकडाऊन कालावधीत येत असल्यास सदर ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.निमखारे पाणी मत्स्यसंवर्धन, कोळंबी संवर्धन प्रकल्पाच्या परवान्याची मुदत लॉकडाऊन कालावधीत संपलेली असल्यास सदर परवान्याच्या नुतनीकरणासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत तटीय जलकृषी प्राधिकरणास शिफारस करण्यात यावी असे निर्देश राज्य सरकारचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री यांनी दिले आहेत.१ एप्रिल २०२० पासून पुढील सहा महिन्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मासेमारी परवाना नूतनीकरणासाठी एकूण सहा महिन्यांची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 1:01 AM