Join us

तोतया पोलिसांनी आजीला साेन्याच्या माळेऐवजी दिला काचेचा तुकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

दादरमधील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढे सोनसाखळी चोरी झाली असल्याचे सांगून ताेतया पाेलिसांनी ७६ वर्षीय आजीला गळ्यातील ...

दादरमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुढे सोनसाखळी चोरी झाली असल्याचे सांगून ताेतया पाेलिसांनी ७६ वर्षीय आजीला गळ्यातील सोन्याची माळ कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. आजीनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडील कागदाच्या पुडीत माळ ठेवली. त्यांनी ती नजरचुकीने पळवली. पुढे गेल्यानंतर कागदाची पुडी उघडली असता त्यात सोन्याच्या माळेऐवजी काचेचा तुकडा असल्याचे पाहून आजीला धक्का बसला. त्यांनी तत्काळ दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

दादर परिसरात ७६ वर्षीय सुलोचना आजी मुलगा, सून आणि नातीसोबत राहण्यास आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ जून रोजी दादर येथील कुंभारवाडा परिसरात घराकामासाठी जात असताना, दुपारी एकच्या सुमारास एस. के. बोले मार्गावर एका अनोळखी व्यक्तीने त्याची दुचाकी थांबवून पोलीस असल्याचे सांगितले. आताच एका महिलेची सोनसाखळी चोरी झाल्याचे सांगून तुम्हीसुद्धा गळ्यातील सोन्याची माळ काढून या कागदाच्या पुडीत ठेवा, असे सांगितले. त्या पाठोपाठ आणखी एक तरुण तेथे आला व त्याने लवकर माळ काढून ठेवा, असे सांगितले.

दोघेही एकदम तेथे आल्याने आजी गाेंधळल्या. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या कागदाच्या पुडीत माळ ठेवली. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये सोन्याच्या माळेऐवजी काचेचा तुकडा सापडला. त्यानंतर आजीने मागे जाऊन शोध घेतला असता तेथे कोणीही नव्हते. तिने याबाबत कुटुंबीयांना सांगून दादर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

................................................