Join us

इमान भारावली स्वत:च्या स्पर्शाने

By admin | Published: April 11, 2017 12:54 AM

जगातील सर्वांत लठ्ठ महिला म्हणून नोंद असलेल्या इमानचे वजन ५०० किलो होते. प्रचंड वजनामुळे ती हालचाल करू शकत नव्हती. परंतु आता तिचे वजन ३४० किलोवर आले आहे.

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला म्हणून नोंद असलेल्या इमानचे वजन ५०० किलो होते. प्रचंड वजनामुळे ती हालचाल करू शकत नव्हती. परंतु आता तिचे वजन ३४० किलोवर आले आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच ती स्वत:च्या चेहऱ्याला स्पर्श करू शकली आणि त्यामुळेच भारावून गेल्याचे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी सांगितले. इमानने डॉ.लकडावाला यांचे आनंदाने चुंबन घेत त्यांचे आभार मानले. ११ फेब्रुवारी भारतात आगमन झाले, त्यावेळेस इमानचे वजन तब्बल ५०० किलो होते. चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. येथे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर आणि डॉक्टरांच्या चमूच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल १६० किलो वजन घटवले आहे. लवकरच इमान इजिप्तला घरी परतणार आहे. इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येईल असे डॉ. लकडावाला म्हणाले.पुढच्या दोन आठवड्यांत इमानचे सिटीस्कॅन केले जाणार आहे. पूर्वी इमानला आकडी येत असे. मात्र, त्यावेळेस केवळ तिच्या वजनामुळे तिचे सिटीस्कॅन करता आले नाही. त्यानंतर, आता यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आल्यानंतर इमानला घरी जाता येईल. आता इमान स्वत: बसू लागली आहे, पुढच्या शस्त्रक्रियेनंतर ती स्वत:च्या पायावर उभी राहावी, असा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. लकडावाला यांनी सांगितले. (प्रतिनिधी)हालचाल करणे शक्यतब्बल २५ वर्षानंतर बेरिएट्रिक सर्जरीसाठी इमान फेब्रुवारीमध्ये इजिप्तहून भारतात दाखल झाली. चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात इमानसाठी वन बेड हॉस्पिटल बांधण्यात आले आहे. इजिप्तमध्ये राहणाऱ्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला होती. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडताच आले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून होती. आता ती स्वत: हालचाल करू लागली आहे.