Join us

मला फक्त एक बोट लावून दाखवा, पुण्याच्या तरुणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 1:55 PM

एका मुलीनं राम कदम यांनी खुलं आव्हान दिलं आहे.

मुंबई- मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मुलगी पसंत असल्यास तिला पळवून आणण्यास मदत करेन, असं बेताल वक्तव्य राम कदम यांनी दहिहंडी उत्सवात केलं होतं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनीही सारवासारवाची भूमिका घेतली आहे.  विरोधकांसह सर्वसामान्यांनी राम कदम यांच्या या वादग्रस्त विधानाबद्दल संताप व्यक्त केला असून, त्यांच्यावर महिला वर्गही संतप्त झाला आहे.राम कदम यांनी मुली पळवून आणल्याच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटक-यांनीही राम कदम यांना धारेवर धरलं आहे. आता एका मुलीनं राम कदम यांनी खुलं आव्हान दिलं आहे. तिनंही एका व्हिडीओच्या माध्यमातून राम कदम यांनी खडे बोल सुनावले आहे.व्हिडीओत ती म्हणते, जय जिजाऊ, जय शिवराय, जय रौद्रशंभू, मी मीनाश्री पाटील पुण्याहून बोलतेय, काल घाटकोपरमधल्या दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी एक वक्तव्य केलं होतं. तुम्हाला मुलगी आवडली की मला एक कॉल करा, मी तिला उचलायला मदत करतो. राम कदम तुम्हाला मी चॅलेंज करतेय. मला तुम्ही मुंबईमध्ये बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते. मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा. बाकी पुढचं उचलून नेण्याची गोष्ट मी नंतर बघते, तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे, ते अत्यंत लांच्छनास्पद आहे, शिवाय आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, इथं स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची इथे महाराष्ट्रामध्ये जागा नाहीये. तुम्ही ज्या काही प्रकरणावर बोललेला आहात ना, मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने सामने, तुमच्या फोनची मी नक्कीच वाट बघेन, आजपर्यंत तुम्हाला मी खूप कॉल केले होते. याच्या आधीच्याही तुमच्या काही वक्तव्यांवर कॉल केले होते. शिवाय आताही मी कॉल केले होते. पण तुम्ही कॉलचं अॅन्सर केलेलं नाहीयेत. आता प्रतीक्षा मला तुमच्या कॉलची आहे सर, नक्की कॉल करा मला, तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारावं ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद..काय म्हणाले होते राम कदम?भाजपा आमदार राम कदम यांनी काल घाटकोपरमध्ये दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहिहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.

टॅग्स :पुणेराम कदम