मुंबई उत्तर पश्चिममध्ये 'टफ फाइट', मतमोजणी केंद्रावर नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:43 PM2024-06-05T19:43:32+5:302024-06-05T19:46:34+5:30
आधी कळलं की अमोल कीर्तिकर विजयी, मग नंतर कळलं की वायकर विजयी झालेत. ठाकरे गटाकडून निकालावर आक्षेपही घेतला गेलाय.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. मतमोजणीनंतर राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. मुंबईतील सहा मतदार संघांचा विचार करायचा झाला तर पाच मतदार संघांमधील चित्र दुपारी २ वाजेपर्यंत जवळपास स्पष्ट झालं होतं. पण जिथं सर्वात चुरशीचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा निकाल ठरला तो एक मतदार संघ म्हणजे मुंबई उत्तर-पश्चिम. शिंदेंचे रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरेंचे अमोल कीर्तिकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. इतकी की निकाल जाहीर व्हायला रात्रीचे आठ वाजले आणि अवघ्या ४८ मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषीत करण्यात आलं. पण तोवर मतमोजणी केंद्रावर बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. बरंच गोंधळाचं आणि संभ्रमाचं वातावरण होतं. आधी कळलं की अमोल कीर्तिकर विजयी, मग नंतर कळलं की वायकर विजयी झालेत. ठाकरे गटाकडून निकालावर आक्षेपही घेतला गेलाय. उत्तर-पश्चिम मतदार संघात मतमोजणी केंद्रावर नेमकं काल दिवसभरात काय घडलं? हेच आपण जाणून घेणार आहोत.
गोरेगावच्या नेक्सो सेंटर इथं सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक फेरी गणिक कधी रवींद्र वायकर आघाडीवर तर कधी अमोल कीर्तिकर आघाडीवर असं चित्र होतं. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट जाणवत होतं. प्रत्येक फेरीनंतर एक एक मताची चढाओढ होतेय हे लक्षात आल्यानंतर धाकधूक वाढली होती. निकाल रंगतदार होतोय हे जस जसं लक्षात आलं तसं दोन्ही उमेदवारांच्या पोलींग प्रतिनिधींनी उमेदवारांनाही याची कल्पना दिली. उमेदवारही मतमोजणी केंद्रावर आले. कीर्तिकरांच्या बाजूनं सुनील प्रभू आणि अनिल परब तर वायकर यांच्या बाजूनं आशिष शेलार प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. 'कट टू कट फाइट' सुरु असल्यानं नेमकं काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या प्रेस रुममध्येही प्रत्येकाची धडपड सुरू होती. दुपारी ५ वाजताच्या सुमारास सुनील प्रभू आणि अनिल परब बाहेर आले. त्यांनी अमोल यांचा २२०० मतांनी विजय झाल्याचं जाहीर केलं आणि कीर्तिकरांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. पण त्याचवेळी वायकरांनी मतमोजणीवर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केलीय असंही त्यांनी सांगितलं. समोरच्या उमेदवाराकडून रडीचा डाव खेळला जातोय असा आरोप अनिल परब यांनी केला.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप निकालाबाबत काहीच माहिती समोर येत नव्हती. फेरमतमोजणी झाली आणि त्यात अमोल कीर्तिकर EVM मधील मतांमध्ये एका मतानं आघाडीवर असल्याचं निष्पन्न झालं तर पोस्टल मतांमध्ये वायकर यांना कीर्तिकरांपेक्षा ४९ मतं अधिक होती. त्यानुसार वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषीत केलं गेलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमोल कीर्तिकर यांना EVM मधून मिळालेली मतं आहेत ४ लाख ५१ हजार ९५ आणि वायकर यांना मिळालेली मतं आहेत ४ लाख ५१ हजार ९४. कीर्तिकरांना एक मत जास्त होतं. पण खरा उलटफेर झाला होता तो पोस्टल मतांचा. कीर्तिकरांना १५०१ पोस्टल मतं मिळाली आणि वायकरांना १५५० मतं मिळाली. त्यानुसार वायकर ४८ मतांनी आघाडीवर होते. आयोगाकडून १११ पोस्टल मतं बाद ठरवली गेली होती. आयोगाच्या या निकालावर कीर्तिकर यांच्याकडून आक्षेप घेतला गेला. बाद झालेल्या १११ पोस्टल मतांची फेरतपासणी करण्याची मागणी केली. हे सर्व सुरू असताना मतमोजणी केंद्राबाहेर मात्र दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू होती. वातावरण चांगलंच तापलं होतं. जी १११ पोस्टल मतं बाद ठरवली होती ती बादच असल्याचं फेर तपासणीतही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
अंतिम निकाल लागेपर्यंत साडेसात वाजून गेले होते. अमोल कीर्तिकरांनी मतमोजणीतचं संभ्रम असल्याचा मुद्दा उपस्थित करत एक पत्रच निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं. त्यात मतमोजणीच्या २६ फेऱ्यांपैकी काही यादीतील संख्येमध्ये आणि आमच्या काऊंटिंग एजंटनं दिलेल्या संख्येमध्ये सुमारे ६५० मतांचा फरक असल्याकारणानं तसंच EVM मधील मोजणीत विजयी उमेदवारामध्ये केवळ एका मताचा फरक असल्यानं EVM ची फेरमतमोजणी करावी अशी मागणी केली गेली. पण हे पत्र आयोगाला निकाल जाहीर केल्यानंतर देण्यात आलं. तसा उल्लेख पत्र स्वीकारताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून या पत्रावर करण्यात आलाय. निकाल रात्री ७ वाजून ५४ मिनिटांनी जाहीर केला गेला आणि आक्षेप रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी घेतला गेल्याचा उल्लेख आढळतो.
आयोगाच्या फेरतपासणीनंतर रवींद्र वायकरच विजयी उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी कीर्तिकर गटाकडून मात्र निकालावर संशय व्यक्त केला गेला आहे. वायकरांचा हा विजय संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटानं दिलीय. निकालाविरोधात आयोगात जाण्याची तयारी करण्यात येतेय अशीही माहिती समोर आलीय. यासंदर्भात राष्ट्रपतींनाही पत्र लिहिण्याची तयारी केली जातेय अशीही माहिती समोर आलीय.