मलमपट्टीनंतरही खडतर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:51 AM2018-07-20T00:51:29+5:302018-07-20T00:52:08+5:30
खड्डे बुजविण्यासाठी ‘कोल्डमिक्स’ पडतेय अपुरे
मुंबई : खड्ड्यांवरून टीका झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली. पण पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाड भागात रस्त्यांवर मलमपट्टी केल्यानंतरही खड्डे ‘जैसे थे’ असल्याने मुंबईकरांचा खडतर प्रवास कायम आहे. तर दुसरीकडे हे खड्डे बुजविण्यासाठी लागणारे ‘कोल्डमिक्स’ अपुरे पडत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
पश्चिम उपनगरातील कांदिवली व मालाड या ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. पण काही दिवसांत या भागात पुन्हा खड्डे पडले आहेत. परिणामी या भागात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात
होते. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याचे वाहनचालकांना मनस्ताप सहन
करावा लागत आहे. कांदिवली पूर्वेकडील पश्चिम दु्रतगती मार्गालगत असणाऱ्या आशानगर येथे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे.
मालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानकापासून ते आप्पापाडापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे सकाळी आणि सायंकाळी मोठी वाहतूककोंडी निर्माण होते. महापालिकेकडून खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. पण हे खड्डे बुजविण्यासाठी लागणारे कोल्डमिक्ससुद्धा अपुरे पडत असून परिस्थिती मात्र ‘जैसे थे’ असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी महापालिकेवर टीकेची झोड उठत असून ४८ तासांत उर्वरित खड्डे बुजविले जातील, असा दावा महापालिकेने केला होता. मात्र, हे खड्डे अजून बुजविले नसल्याने पालिकेचा हा दावा खोटा ठरला आहे. मालाड पूर्वेकडील सब-वे परिसरात प्रचंड खड्डे पडल्याने या भागात मोठी वाहतूककोंडी होते. तसेच जिजामाता हायस्कूल येथेही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून शाळेत येणाºया विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कांदिवलीमध्ये नुकतेच मनसेने आंदोलन करून खड्डे बुजविले होते. मात्र आजही त्या रस्त्यांची दुरवस्था कायम असून संबंधित विभाग याकडे कानाडोळा करीत असल्याचे मनसेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.
कांदिवलीतील मनसे विभागाध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यासंदर्भात म्हणाले, मनसे आंदोलनानंतर पेव्हर ब्लॉक व खडी वापरून रस्त्याच्या तात्पुरत्या डागडुजीचा प्रयत्न सुरू असून तो पुरेसा नाही. सतत पाठपुरावा करूनही प्रशासन मात्र ढिम्म आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून एमएमआरडीएच्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही आम्ही केली आहे. आर-साऊथ विभागामध्ये १३ वॉर्ड असून त्यासाठी पुरेसे कोल्डमिक्स इथल्या प्रशासनाकडे उपलब्ध नाही, त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न सुटणे मुश्कील आहे.
मालाडमधील जिजामाता शाळेसमोरील खड्ड्यांमध्ये भराव टाकून खड्डे बुजविले होते. परंतु जोरदार पावसाने पुन्हा खड्डे होऊ लागले. या ठिकाणी दरवर्षी खड्डे पडतात. महापालिकेला सांगण्यात आले असून त्वरित खड्डे बुजविण्याचे आश्वासन महापालिकेने दिले आहे.
- राकेश धनावडे, शाखाध्यक्ष, मनसे
कोकणीपाडा ते संतोषी माता मंदिर या मार्गावरील पेव्हर ब्लॉक काढून दुसरे बसविण्यात आले होते. परंतु आता हे पेव्हर ब्लॉक उंच-सखल असल्याने मार्गाची स्थिती खराब झाली आहे. खड्ड्यांमधून जात असताना गाडी एका बाजूला गेल्याने अपघातही होतात. कर भरूनसुद्धा आम्हाला चांगले रस्ते मिळत नाहीत.
- सुरेश कट्टे, रिक्षाचालक