सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी पहिल्यांदाच संकेतस्थळ अत्याधुनिक केले जात आहे. विदेशी पर्यटकांसाठी संकेतस्थळावर १५ भाषा उपलब्ध करून देत आहोत. हॉटेल, गाईड, टूर एजेंट अशी सर्व इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर असेल. रिअल टाईममध्ये उत्तरे दिली जातील. शिवाय महाराष्ट्र टुरिझम अॅपही बनवत आहोत. ई-मेल, व्हॉट्सअॅप मार्केटिंग सुरू आहे. कोरोना काळात पर्यटनही डिजिटल हाेत आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
१. कोरोना, लॉकडाऊनचा फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला कसा बसला?
सध्या केवळ १३ ते १४ टक्के हॉटेल्स सुरू आहेत. म्हणजे ८६ ते ८७ टक्के हॉटेल बंद आहेत. या लोकांना इंडस्ट्रीचा दर्जा आहे. परंतु, त्यांना त्याचे लाभ मिळत नाहीत, अशी तक्रार होती. ती निकाली काढली आहे. त्यांना जे कर कमर्शियल दराने भरावे लागत होते, ते आम्ही त्यांना औद्योगिक दराने भरण्याची संधी दिली. या वर्षीसाठी एप्रिल महिन्यापासून ही सेवा सुरू केली आहे.
२. कोरोना काळात पर्यटकांवर कसे लक्ष केंद्रीत करत आहात?
काेराेना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन लवकर सुरू हाेण्याची चिन्हे नाहीत. पूर्वी ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पर्यटक येते होते, तशी स्थिती पूर्ववत होण्यासाठी २०२५-२६ साल उजाडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे आम्ही देशी पर्यटनाला प्राेत्साहन देत आहाेत. यात दोन प्रकार आहेत. एक राज्यातले पर्यटक आणि दुसरे म्हणजे बाहेरील राज्यातून येणारे पर्यटक. या दाेघांवरही जास्त लक्ष केंद्रीत करणार आहोत.
३. पर्यटनात नवे काय आणत आहात?
२० छोट्या महोत्सवांचे आयोजन करण्यात येईल. महाराष्ट्र ट्रॅव्हल मार्ट अंतर्गत राज्याबाहेरील पर्यटक किंवा टूर ऑपरेटर्स आहेत, त्यांना राज्यात पाहण्यासारखे काय आहे, याची माहिती दिली जाईल. कृषी पर्यटन धोरण आणले आहे, असे धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या अंतर्गत संबंधित भागातील शेतकरी कृषी पर्यटनाचे युनिट स्थापन करतील. या धोरणांतर्गत २५० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. १०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. याद्वारे पर्यटकांना ग्रामीण जीवनाचा आनंद घेता येईल. सप्टेंबरपासून बीच शॅक सुरू करण्याचा मानस आहे. साहसी पर्यटनासाठीही धोरण तयार होत आहे.
४. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार कसा देणार?
८० टक्के रोजगार स्थानिकांना मिळेल, यावर भर दिला जात आहे. सेंकड होम बंगल्यांचा वापर पर्यटनासाठी होत आहे. गाईडसाठी योजना आणली आहे. यात स्थानिकांना प्राधान्य देत आहोत. यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमाची फी महाराष्ट्र पर्यटन स्वत: भरेल. आम्ही एक हजार गाईड तयार करणार आहोत. पर्यटनांतर्गत महिलांना जास्तीत जास्त रोजगार देण्यावर भर देणार आहोत.
..............................................