मनीषा म्हात्रेमुंबई : घाटकोपर विमान दुर्घटनेत पाच जणांचा बळी गेला. मात्र, याचे गांभीर्य न ठेवता, शुक्रवारी हेच दुर्घटनास्थळ पर्यटनस्थळ बनले होते. बघ्यांना आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली़ अखेर पोलिसांना बघ्यांना रांगेत घटनास्थळी सोडावे लागले़ सकाळपासूनच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती़त्याच वेळी तेथे मोजणी सुरू होती़ सरकारी कर्मचाऱ्यांना बघ्यांमुळे अडथळा येत होता़ पोलिसांना सुरक्षेचे काम सोडून बघ्यांना आवरावे लागले़ बघ्यांच्या गर्दीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण होते़ त्यामुळे पोलिसांना त्यांना आवरणे कठीण होत होते़ तेथे अधिक वेळ थांबू नका, कर्मचाºयांना काम करू द्या, असे सांगताना पोलिसांची दमछाक उडत होती़ आम्हाला ते विमान बघायचेच आहे़ आम्हाला तेथे जाऊ द्या, असे बघे पोलिसांना सांगत होते़महिलांना आवरणे तर पोलिसांसाठी दिव्यच होते़ अखेर पोलिसांनी बघ्यांना रांगेत उभे केले़ पोलिसांनी एक-एक करून बघ्यांना घटनास्थळी सोडले़बघेदेखील घटनेचे गांभीर्य न बाळगता विमानाची दुरवस्था बघत होते़ स्थानिकांनी मात्र बघ्यांवर टीका केली़ या माणसांना कसलेच सुख-दु:ख नाही, अशी भावना स्थानिक व्यक्त करीत होते़ दुपारनंतर बघ्यांची गर्दी ओसरली़ मात्र, तोपर्यंत पोलिसांना कर्तव्य सोडून बघ्यांना सांभाळावे लागले़दात, नाक, कडा आणि कर्णफुलांनी पटली ओळखविमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. यामध्ये नाकाचे हाड, दात तर कुणाच्या हाताची कडा, अंगठी आणि कर्णफुलांमुळे मृतदेहांची ओळख पटली. पाचही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैमानिक प्रदीप राजपूत यांची त्यांच्या हातातील कड्यामुळे ओळख पटली, तर सहवैमानिक मारिया जुबेरी यांची अंगठी, तर तंत्रन्य सुरभी गुप्ता यांची कर्णफुलांमुळे कुटुंबीयांकडून ओळख पटविण्यात आली. यामध्ये मनीष पांडे यांच्या दातामुळे तर कामगार गोविंद दुबे यांची त्यांच्या नाकाच्या हाडामुळे ओळख पटली. त्यांचे जन्मजातच नाक वाकडे होते. त्यावरून त्यांच्या नातेवाइकांनी ते ओळखले.पाचही जणांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे सहायक पोलीस आयुक्त मानेक सिंह पाटील यांनी सांगितले.घटना स्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे, तसेच नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब नोंदवून अधिक चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणेकडून आलेल्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अप्पर पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांनी सांगितले.
दुर्घटनास्थळ बनले पर्यटनस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 5:51 AM