Join us  

मुंबई खुणावतेय क्रूझ पर्यटनाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 5:48 AM

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबापुरी आता क्रूझ पर्यटनासाठी सज्ज होत आहे. क्रूझ पर्यटनामध्ये सध्या जगभर अनेक संधी उपलब्ध होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबापुरी आता क्रूझ पर्यटनासाठी सज्ज होत आहे. क्रूझ पर्यटनामध्ये सध्या जगभर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच मुंबईला सध्या क्रूझ पर्यटन खुणावत आहे. यासंदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहेत.देशातील क्रूझ पर्यटनाचे जाळे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पसरविण्यासाठी मुंबईने पुढाकार घेतला आहे. क्रूझ पर्यटनाच्या वाढीसाठी आराखडाच तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. यासाठी केंद्राच्या नौकावहन आणि पर्यटन मंत्रालयानेही हातभार लावला आहे. महत्त्वाचे म्हणजे, क्रूझ पर्यटनवाढीसाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. एका अभ्यासानुसार, दरवर्षी ४० लाख प्रवासी देशाला भेट देतात. त्यापैकी ३० लाख प्रवासी मुंबईला भेट देतात. त्यामुळे क्रूझ पर्यटनातही मुंबईची भरभराट होणे शक्य आहे.या सर्व शक्यतांचा विचार करून क्रूझ पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी ८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता ट्रायडंट हॉटेल येथे क्रूझ पर्यटनाशी निगडित एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला नौकावहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, केंद्रासह राज्याच्या विविध खात्यांच्या सचिवांचीही उपस्थिती असेल. विशेष म्हणजे, क्रूझ पर्यटन क्षेत्रातील आघाडीच्या चार कंपन्याही या परिषदेत सहभागी होणार असल्याचे, संजय भाटिया यांनी म्हटले आहे.