गणपतीपुळेत पर्यटन दिनाबाबतची बैठक

By admin | Published: September 23, 2014 09:54 PM2014-09-23T21:54:45+5:302014-09-23T23:54:01+5:30

गजबजणार क्षेत्र : स्वच्छता व दिंडीवर भर देण्याचा निर्णय

Tourism Day meeting in Ganapatipule | गणपतीपुळेत पर्यटन दिनाबाबतची बैठक

गणपतीपुळेत पर्यटन दिनाबाबतची बैठक

Next

गणपतीपुळे : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.पर्यटन दिनाचे आयोजन करण्याबाबतची नियोजन बैठक आज (सोमवारी) गणपतीपुळे येथील पर्यटन विकास महामंडळ सभागृहात व्यवस्थापक सुधाकर आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत जागतिक पर्यटन दिनाचे नियोजन विविध प्रबोधनात्मक व पर्यटनात्मक उपक्रमांनी करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य पर्यटन आणि समूह विकास असे राहणार आहे. पर्यटन दिंडीमध्ये खास उंट व घोडे आकर्षण ठरणार आहे. तसेच ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत व विविध पर्यटनात्मक घोषणांची जनजागृती करीत दिंडी संपूर्ण गणपतीपुळे परिसरात काढण्यात येणार आहे.
पर्यटन दिनाचे औचित्य साधून गणपतीपुळे येथे समुद्र चौपाटी परिसरात मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातील एनसीसी पथकाचे विद्यार्थी स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. गणपतीपुळे येथील मोरया चौपाटी व आपटा तिठा परिसरात गणपतीपुळे पर्यटक निवास व पर्यटन व्यावसायिक संघटना यांच्यावतीने स्वच्छता उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
यावेळी स्वच्छता उपक्रमात गणपतीपुळे येथील पर्यटक निवास व पर्यटन व्यावसायिक संघटनेचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.बैठकीला गणपतीपुळे पर्यटक निवासाचे व्यवस्थापक सुधाकर आवटे, सहायक व्यवस्थापक किशोर जाधव, पर्यटन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद केळकर, लंबोदर पर्यटन संघटनेचे अध्यक्ष उमेश भणसारी, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष किरण सावंत, बळीराम परकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक राऊत, गणपतीपुळे येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय देवरुखकर, माजी सरपंच बाबाराम कदम, दत्तात्रय कुलकर्णी, नितीन घनवटकर, मिलिंद पडवळे, स्वरुपा सरदेसाई, सुयोग भिडे, वैभव पवार, संजय रामाणी, बावा घाणेकर, देवरुखकर उपस्थित होते. रामाणी यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.गणपतीपुळे पर्यटनविषयक विकासाससंदर्भातील बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. (वार्ताहर)

Web Title: Tourism Day meeting in Ganapatipule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.