पर्यटन प्रकल्प पायाभूत सुविधांअभावी रखडले
By admin | Published: February 18, 2017 06:49 AM2017-02-18T06:49:06+5:302017-02-18T06:49:06+5:30
एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) मुंबईतील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प
मुंबई : एमटीडीसीकडून (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) मुंबईतील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तीन महत्त्वाचे प्रकल्प आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यात हॅलिकॉप्टरमधून मुंबई दर्शन, सी-प्लेन आणि समुद्रात पंचतारांकित हॉटेल यांचा समावेश आहे. परंतु पायाभूत सुविधांअभावी तीनही प्रकल्प रखडले आहेत. दोन प्रकल्पांसाठी जेट्टी आणि एका प्रकल्पासाठी हॅलिपॅडची जागाच उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प पुढे सरकण्यास अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबईचे हेलिकॉप्टरमधून दर्शन घेण्याची सुविधा नाही. हे पाहता एमटीडीसीने पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून मुंबईचे दर्शन घडविण्यासाठी हेलि-टूरिझम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची सुरुवात जानेवारी २0१६मध्ये केली. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी १० मिनिटांसाठी ३,२00 रुपये आकारणी करण्यात आली. उत्तर मुंबईत प्रकल्प सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईत प्रकल्प सुरू केला जाणार होता. परंतु हॅलिपॅडसाठी अद्यापही जागा न मिळाल्याने दक्षिण मुंबईतील प्रकल्प पुढे सरकलेला नाही. जागेचा शोध सुरू असून, तीच परिस्थिती अन्य दोन प्रकल्पांचीही आहे.
पर्यटकांसाठी मुंबईतील समुद्रात पंचतारांकित हॉटेल अशी संकल्पना अंमलात आणण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नशील आहे. यासाठी एमटीडीसी आणि एका कंपनीच्या संयुक्त उपक्रमाने राजभवनापासून साधारपणे एक ते दीड किलोमीटर आत तरंगणारे पंचतारांकित हॉटेल असेल. सहा मजली जम्बो जहाजात हे हॉटेल असणार आहे. जवळपास १७५ कोटी रुपये किंमत असणाऱ्या या तरंगणाऱ्या हॉटेलमध्ये बँक्वेट (समारंभासाठी हॉल), स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट, बार, सभागृह, हेल्थ क्लब तसेच पर्यटकांना राहण्यासाठी रूम असतील. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल ३४0 रूम्स या हॉटेलमध्ये असणार आहेत. परंतु जेट्टीच मिळत नसल्याने गेल्या दीड वर्षात हॉटेल उभेच राहू शकले नाही. त्यालाही जागा मिळत नसून जागांचा शोध सुरू आहे. जेट्टीची हीच समस्या सी-प्लेनसारख्या प्रकल्पासही सतावत आहे. जुहू ते नरिमन पॉइंट असा सी-प्लेनचा शुभारंभ २0१५च्या अखेरीच करण्यात आला. परंतु जेट्टीच उपलब्ध होत नसल्याने सी-प्लेन उतरणार तरी कसे, असा सवाल उपस्थित झाला. (प्रतिनिधी)