लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेने ‘आरे’च्या प्रेमापोटी भाजपसोबतचा संसार मोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. नव्या सरकारमध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण विभागाचे मंत्रिपद आले. त्या विभागासाठी या अर्थसंकल्पात एक हजार ३६७ कोटी रुपये देण्यात आले आहे.त्यांच्याकडे हा विभाग आल्यानंतर या विभागाचे नामकरण पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असे करण्यात आले. ‘माझी वसुंधरा’ हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमातून नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जागरुक केले जाणार आहे. त्यासाठी हा निधी खर्च केला जाईल.
औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण कमी करण्याकरिता सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याकरता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एक विस्तृत प्रस्ताव तयार केला असून त्यासाठी ३ हजार ४८७ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही अजित पवार यांनी जाहीर केले.
समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा वृक्षराजी दुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येणाऱ्या मर्यादा विचारात घेता, पुढील काळात तज्ज्ञांच्या सल्ल्याने हवाई बीज पेरणी तंत्रज्ञानाने वृक्षारोपण करण्याचे शासनाने ठरविले आहे. समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा वृक्षराजी निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात येणार असून या आर्थिक वर्षात वन विभागास १,७२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
नागपुरात ‘गोंडवाना थीम पार्क’ची निर्मिती नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात ‘गोंडवाना थीम पार्क’ची निर्मिती करण्यात येत आहे, तिथे सफारीही सुरू करण्यात येणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह सफारी व व्याघ्र सफारीचे नूतनीकरण, प्राणी संग्रहालयात नवीन प्रजातींचे प्राणी आणणे, ई बस, ई-गोल्फ कार्ट, फुलपाखरू उद्यान इत्यादी अभिनव उपक्रमही सुरू करण्यात येतील.