पलूचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण

By Admin | Published: June 29, 2017 02:40 AM2017-06-29T02:40:25+5:302017-06-29T02:40:25+5:30

जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात झालेल्या दमदार पावसाने पर्यटकांचे आकर्षण असलेला पलूचा धबधबा धो-धो कोसळू लागला आहे.

Tourist Attractions of Palu | पलूचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण

पलूचा धबधबा पर्यटकांचे आकर्षण

googlenewsNext

राहुल वाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : जूनच्या शेवटच्या आठवडयात विक्रमगड व परिसरात झालेल्या दमदार पावसाने पर्यटकांचे आकर्षण असलेला पलूचा धबधबा धो-धो कोसळू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांचा लोंढा येथे लोटू लागला आहे.
जबदस्त पाऊस झाल्याने या परीसरातील नदी, नाले, ओहळ दुथडी भरुन वाहू लागले आहेत़ शेतामध्ये पाणी साठलेले आहे व सर्वत्र हिरवळ पसलेली आहे़ तर तालुक्यातील लहान मोठे धबधबे जोमाने वाहू लागले आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचा खळखळाट असे निसर्गसौदर्य लाभलेला विक्रमगडमधील मनोहरी पिकनिक पाईट म्हणजेच पलूचा धबधबा विक्रमगडची शान असून निसर्गाने भरभरुन दिलेल्या या परीसरात वर्षभर पर्यटकांची गर्दी असतेच मात्र खास करुन पावसाळयात पर्यटकांची तुडुंब गर्दी असते़
एकीकडे मिनी महाबळेश्वर म्हणून जव्हारची ओळख तर विक्रमगड हा हरितपटटा म्हणून ओळखला जात असला तरी येथील हिरवाईच्या सौदर्यात विक्रमगडचा पलूचा आणि जव्हारचा दाभोसा धबधबा अधिक भर टाकत आहे़ त्यामुळे या दोन्ही ठिकाणांना भेट दिल्याशिवाय ख-या निसर्गाचे दर्शन पूर्णच होत नाही़ पावसाळा सुरु झाला की, या नैसर्गिक सौदर्यात भर घालतात ते येथील पांढरेशुभ्र धबधबे विक्रमगडपासून डोंगर भागात उंचावर जंगल पसरलेले आहे. विविध प्रजातीचे व रंगीबेरंगी पक्षीही येथे पाहावयास मिळत असल्याने पक्षी निरिक्षकही या भागात येथे येत असतात़ पलुचा धबधबा हा जव्हार-विक्रमगड महामार्गापासून आत डोंगरी भागात आहे़
जून ते आॅक्टोबर याकाळात येथे मोठया प्रमाणात पर्यटक येतात. चिखलवाट तुडवतच येथे जावे लागते़. या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते़ मुंबई परिसर व अन्य ठिकाणाहून पर्यटक येथील निसर्गाचे अद्भुत रुप पाहावयास येतात़ या धबधब्यांच्या डोंगरमाथ्यावरुन पाहाल तर जिथे तिथे हिरवे साम्राज्य आणि त्यातून डोकावणारे छोटे छोटे धबधबे दिसतात. विक्रमगड पासून अवघे ८ कि़मी अंतरावर जांभा गावानजिक हा धबधबा आहे.
विक्रमगड मधील शाळा, कॉलेजचे विदयार्थी सहलीसाठी येथे वर्षातून भेट देत असतात. या धबधब्याच्या जलधारा अंगावर घेत त्यात मनमुराद डुबणा-या पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा धबधबा सज्ज आहे. पावसाळयात पर्यटकांची गर्दी वाढत असते़ या स्थानाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असून येथील ग्रामस्थ त्यासाठी प्रयत्नशील आहेत़ या धबधब्याच्या पठारी भागात धरण बांधल्यास हा धबधबा बारमाही वाहू शकतो. तसेच या भागातील जमीन ओलिताखाली येउन पंचक्रोषीतील भाग सुजलाम, सुफलाम होउ शकेल दोन डोंगराच्या मधोमध पठारी भागामध्ये झालेला धबधबा उगम आणि आजुबाजुची नितांत सुंदर हिरवीगार वनराई यामुळे या धबधब्याला भेट देणे पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते़
या ठिकाणी भिवंडी, वाडा, विक्रमगड मार्गे जाता येते. तसेच मुंबई अहमदाबाद मार्गाने मनोर नाक्यावरून उजवीकडे वळून विक्रमगड मार्गे जाता येते. त्याचप्रमाणे ठाणे-घोडबंदर फाऊंटन हॉटेल मार्गेही अहमदाबाद रोड मार्गे जाता येते.
यातला पहिला मार्ग निसर्गसौंदर्याने नटलेला पण काहीसा वेळ खाणारा आहे. तर उर्वरीत दोन मार्ग त्यामानाने जलदगतीने धबधब्यापर्यंत नेणारे आहेत. या परीसरात भोजन व निवासाच्या सुविधा नाहीत. त्यामुळे वन डे किंवा हाफ डे पिकनिक पुरतेच त्याचे महत्व उरलेले आहे. हा परीसर जंगली असल्यामुळे धबधबा पाहण्यासाठी जाताना काळजी व दक्षता घेणे महत्वाचे आहे.

Web Title: Tourist Attractions of Palu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.