मुंबई: राज्यात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता तिसरी लाटही ओसरली असून, संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. याचपार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच, १ फेब्रुवारी २०२२ पासून सर्व पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी २० व्यक्तींची मर्यदा हटवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीत नेमकं काय म्हटलंय?-
- सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचं लसीकरण झालेलं असावं.
- स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये ५० टक्के उपस्थिती असावी.
- अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात.
- उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेनं.
- नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे. तसेच मास्कही वापरण्यात यावा.
- अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेनं सुरु होतील.
- हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार
दरम्यान, राज्यात सोमवारी १५,१४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे तर दुसरीकडे ३५,४५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७३,६७,२५९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात २,०७,३५० रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४२ टक्के, तर मृत्युदर १.८५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासलेल्या ७,४६,२९,४४९ नमुन्यांपैकी १०.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ११,७४,८२५ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर २,७९८ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,२१,१०९ झाली असून, मृतांचा आकडा एक लाख ४२ हजार ६११ इतका आहे.
राज्यात तिसरी लाट नियंत्रणात-
राज्यात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता तिसरी लाटही ओसरली असून, संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. मात्र कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचेही डॉक्टरांनी अधोरेखित केले. मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात येण्याच्या दृष्टिकोनातून पुढील दोन ते चार आठवडे महत्त्वाचे असून, या काळात कोरोना बाधितांच्या मृत्यूत वाढ होण्याची भीती कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली.
राज्यात ग्रामीण भागात कोरोना स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. येथे चाचण्यांचे प्रमाण, रुग्णालयात दाखल होण्याची वेळ, चाचण्या टाळणे यामुळे चिंताजनक स्थिती आहे. परिणामी, पुढील फेब्रुवारी शेवट ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मृत्यूचा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात साधारण २१ डिसेंबरपासून झाली. सुरुवातीला दुसऱ्या लाटेप्रमाणेच रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मात्र मृत्यू नियंत्रणात राहिले. पहिल्या दोन आठवड्यांची तुलना केली असता, दोन आठवड्यांपेक्षा तिसऱ्या आठवड्यात अधिक मृत्यू नोंद झाले.
चिंता करण्यासारखी स्थिती नाही-
कोविडच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये दीर्घकालीन आजार असलेल्या वयस्क व्यक्तींचे मृत्यू अधिक झाले. दुसरी लाट शिखरावर असताना मात्र १ ते १० आणि ११ ते २० वयोगटातील मुलांचे मृत्यू झाले नव्हते. तिसऱ्या लाटेमध्ये या वयोगटातील मात्र अनुक्रमे ४ आणि ६ असे एकूण १० मृत्यू नोंदवले आहेत. मात्र त्यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. तिसरी लाट नियंत्रणात असून मृत्यूदेखील नियंत्रणात येत आहेत. रुग्ण वाढीवर टास्क फोर्स लक्ष ठेवून आहे.