पर्यटकांनो फुलांची नासधूस करू नका
By admin | Published: May 3, 2017 06:40 AM2017-05-03T06:40:13+5:302017-05-03T06:40:13+5:30
भायखळा येथील राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विविध आकारात रंगीबेरंगी फुलांचे
मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेत पेंग्विन पाहण्याकरिता येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी विविध आकारात रंगीबेरंगी फुलांचे सेल्फी पॉइंट विकसित करण्यात आले आहेत. या सेल्फी पॉइंटमधील फुलांची व उद्यानातील फुलझाडांची नागरिकांनी नासधूस करणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महानगरपालिकेने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांच्या सोयीकरिता विकसित केले असून, या उद्यानाला भेट देणारे नागरिक फुलझाडे, सेल्फी पॉइंट, कारंजे या गोष्टींना विद्रूप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, नागरिकांनी असे करू नये, अशी विनंती महापालिकेने केली आहे. दरम्यान, सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात येईल. तर तिकीट विक्रीगृह सायंकाळी ५.३० वाजता बंद करण्यात येईल. शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ४ वाजता व तिकीट विक्रीगृह सायंकाळी ४.३० वाजता बंद करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय प्रत्येक बुधवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात येते. महापालिकेने केलेल्या ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास सदर उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येते व दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बंद ठेवण्यात येते.