राणीच्या बागेचा पर्यटकच ‘राजा’; ९ महिन्यांत तब्बल २१ लाख लाेकांची भेट
By सीमा महांगडे | Published: January 1, 2024 09:40 AM2024-01-01T09:40:42+5:302024-01-01T09:42:22+5:30
कोको, स्टेला, जेरी ठरले आकर्षण.
सीमा महांगडे,मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) नवनवीन प्राणी दाखल झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. कोरोना व टाळेबंदीमुळे घसरलेले प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा वाढले आहे. १ एप्रिलपासून ते २५ डिसेंबरपर्यंत या ९ महिन्यांत २१ लाख ६५ हजार ९०६ पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे. यामधून फक्त ९ महिन्यांत राणीच्या बागेला तब्बल ८ कोटी ४१ लाखांचा महसूल जमा झाला आहे. मागील वर्षाचा राणीच्या बागेचा एकूण महसूल ११ कोटी १५ लाख ३ हजार ७७६ इतका होता.
मागच्या वर्षात २८ लाख ५९ हजार १६ पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली होती. त्यामुळे ११ कोटी १५ लाख ३ हजार रुपयांहून अधिक महसूल जमा झाला असल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनकडून देण्यात आली. हा पालिकेला आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल आहे. यंदा १४ नोव्हेंबर पाडव्याच्या दिवशी रोजी राणीच्या बागेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. प्राणिसंग्रहालयाला एकूण ३९,७९२ पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांच्या या भेटीमुळे महापालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी १४ लाख ४१ हजार ५२५ रुपये एवढा महसूल प्राप्त झाला.
१३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १५७ पक्षी
प्राणी आणि पक्षी कोरोनापूर्व काळात प्राणिसंग्रहालयात केवळ पेंग्विन हेच एक आकर्षण होते.
आता शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत.
प्राणिसंग्रहालयात सध्या नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही आहेत.
असे आहेत तिकिटाचे दर -
चार जणांचे कुटुंब १०० रुपये
प्रौढ ५० रुपये
परदेशी पर्यटक ४०० रुपये
खा. शाळेतील विद्यार्थी १५ रुपये
ज्येष्ठ नागरिक मोफत
तीन वर्षांखालील मुले मोफत
पालिका शाळेतील विद्यार्थी मोफत