लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई, : जम्मू आणि काश्मीरमध्ये येत्या ४ ते ६ महिन्यांत विविध सण, महोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत आहे. सध्या पर्यटनाशी संबंधित घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी यावे, पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि काश्मीर तसेच तेथील लोक उत्सुक आहेत, असे आवाहन काश्मीरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी बुधवारी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रॅव्हल एजन्ट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे अध्यक्ष फारूख कुथू, जम्मू आणि काश्मीरचे मुंबई येथील सहायक पर्यटन अधिकारी बशीर अहमद वानी यावेळी उपस्थित होते.
काश्मीरचे पर्यटन संचालक इटू म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला नेहमीच पसंतीचे स्थान दिले आहे. माता वैष्णोदेवी, हजरतबल दर्गा यांसारखी धार्मिक पर्यटनस्थळे, पहलगाम, सोनमर्ग, दल सरोवर, गुलमर्गसारखी विपुल नैसर्गिक सौंदर्य लाभलेली स्थळे यासह इथली खाद्यसंस्कृती, हस्तकला, पारंपरिक संगीत-नृत्य हे सर्व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय पर्यटन व्यावसायिक, घोडेवाले, बोटिंग व्यावसायिक, शिकारा चालक, टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांचे कर्मचारी, हॉटेल स्टाफ, पर्यटन संबंधित सेवा पुरवठादार यांचेही प्राधान्याने लसीकरण करण्यात आले असून ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. याशिवाय या घटकांना कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक प्रशिक्षणे देण्यात आले आहे.
जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय म्हणाले की, येत्या काळात नवरात्र, दसरा, लोहडी, दिवाळी, ख्रिसमस, नववर्ष, पुढील वर्षात येणारी होळी असे अनेक सण-उत्सव आहेत. अधिक माहितीसाठी www.jammutourism.gov.in तसेच www.jktourism.jk.gov.in आणि www.jktdc.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार
आता कोरोनापश्चात काळात येथील पर्यटनाला पुन्हा बहर येत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधात्मक सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत आहे. पर्यटकांनी लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी केली असल्यास उत्तमच होईल पण हे केले नसले तरी पर्यटक तिथे येऊ शकतात. तिथे आल्यानंतर अँटिजेन चाचणी करून पर्यटकांना संधी देण्यात येणार असल्याचे काश्मीरचे पर्यटन संचालक इटू यांनी स्पष्ट केले.