तौऊते चक्रीवादळाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:05 AM2021-05-15T04:05:18+5:302021-05-15T04:05:18+5:30

मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, ...

Touute cyclone rains will hit Mumbai, Thane, Palghar and Raigad | तौऊते चक्रीवादळाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपणार

तौऊते चक्रीवादळाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपणार

Next

मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौऊते हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला.

भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. १७ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १८ मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे

* समुद्र खवळलेला राहील

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत आहे. येत्या २४ तासांत अरबी समुद्रात तौऊते नावाचे चक्रीवादळ तयार होईल. म्यानमारने चक्रीवादळाला तौऊते हे नाव दिले आहे. १५, १६ आणि १७ मे रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवेल. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव राहील. महाराष्ट्र किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ आणि १७ मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. समुद्र खवळलेला राहील. तासी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील. मच्छीमार यांनी या काळात समुद्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

------------------------------------------

Web Title: Touute cyclone rains will hit Mumbai, Thane, Palghar and Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.