दिलासादायक : धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने!, दिवसभरात आढळला केवळ एक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 06:12 AM2020-12-24T06:12:37+5:302020-12-24T06:13:08+5:30
CoronaVirus News : मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात पालिकेसमोर धारावी येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान होते, हे आव्हान यंत्रणांनी यशस्वीपणे पेलल्यामुळे धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
मुंबई : मुंबईत काेराेनाचा सर्वाधिक संसर्ग असणाऱ्या धारावी परिसरात आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मंगळवारी केवळ एका नवीन रुग्णाची नोंद झाली असून, सध्या या परिसरात केवळ १० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या परिसरातील ३ हजार ४६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात पालिकेसमोर धारावी येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान होते, हे आव्हान यंत्रणांनी यशस्वीपणे पेलल्यामुळे धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
माहिम परिसरात मंगळवारी ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या परिसरात एकूण बाधितांची संख्या ४ हजार ५४२ असून ४ हजार १६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. माहिममध्ये सध्या २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर दादरमध्ये ९ रुग्णांची नोंद झाली. येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ हजार ७३२ झाली आहे.
जी उत्तर विभागात १२ हजार कोरोनामुक्त
मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात मंगळवारी १५ नव्या काेराेना रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोना रुग्णसंख्या १३ हजार ५६ झाली आहे. या विभागात दादर,
माहिम आणि धारावीचा समावेश आहे. सध्या ३६० सक्रिय रुग्ण असून,
१२ हजार ६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.