मुंबई : कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविकांची नाशिक येथे गर्दी होणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्यानिमित्त विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत लवकरच रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.मंत्रालयात महाजन यांच्या दालनात कुंभमेळ्यानिमित्त आढावा बैठक झाली. कुंभमेळ्यानिमित्त संपूर्ण जगाचे लक्ष नाशिकवर केंद्र्रित झाले असून या सोहळ्यासाठी शहराचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. राज्याची कला, संस्कृती आणि संत परंपरा यांचे अनोखे दर्शन या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी आहे. त्याचा योग्य वापर करावा. राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने त्यासाठी प्रयत्न करावेत. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मूलभूत सुविधांची जी कामे सुरू आहेत ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना महाजन यांनी केल्या. कुंभमेळ्यानिमित्त सुशोभिकरणासाठी करण्यात येणाऱ्या विविध संकल्पनांचे सादरीकरण कला दिग्दर्शक नितीन चंद्र्रकांत देसाई, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले. कुंभमेळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होलोग्राम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहभाग असावा, याबाबतही यावेळी सादरीकरण केले. (विशेष प्रतिनिधी)
कुंभमेळ्यासाठी विशेष रेल्वेसाठी करणार प्रयत्न
By admin | Published: May 22, 2015 1:12 AM