Join us

गिरगाव चौपाटीवर जाताय?... सावधान, पुढे धोका आहे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 9:02 AM

गिरगाव चौपाटी व जुहूच्या सिल्वर बीचवर मोठ्या प्रमाणावर जेलीफिश येऊन धडकल्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

मनोहर कुंभेजकर

मुंबई- गिरगाव चौपाटी व जुहूच्या सिल्वर बीचवर मोठ्या प्रमाणावर जेलीफिश येऊन धडकल्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जेलीफिश हे जरी दिसायला सुंदर असले तरीही ते विषारी आणि धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांचा दंश होणार नाही याची काळजी घेऊन सध्या पावसात त्यांचा वावर जास्त असल्याने नागरिकांनी व पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. स्वप्नजा आ. मोहिते यांनी लोकमतशी बोलताना केले. मंगळवारी लोकमत ऑनलाईनमध्ये आणि बुधवारच्या लोकमतच्या अंकात "मुंबईकरांनो जेलीफिश पासून सावधान" या मथळ्याखाली सविस्तर बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी खास रत्नागिरीवरून लोकमतला याविषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. 

जेलीफिशची परिभाषा, त्यांचा वावर कधी असतो, जेलीफिशमधील असलेले विषारी विष, ते चावल्यावर मानवी शरीरावर होणारे परिणाम तसेच यासाठी कोणती उपाययोजना करावी या विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. फायसेलिया असे शास्त्रीय नाव असलेले हे जेलीफिश पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर किंवा ब्लू बॉटल्स म्हणूनही ओळखले जातात. अठराव्या शतकात वापरल्या जाणाऱ्या शिडाच्या युद्धनौकांवरून त्यांना हे नाव पडले आहे. त्यांच्या वायूने भरलेल्या पिशवीचा आकार हा नौकांच्या शिडांप्रमाणे दिसतो. हे जेलीफिश मोठ्या संख्यने समुद्रात मार्गक्रमण करत असतात. त्याला स्वार्मिंग म्हणजे टोळधाडच म्हटले पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

खरं तर हा एक जेलीफिश नसून अतिशय स्पेशलाइज्ड असे हायड्रोझोअन्स (जलव्याल वर्गीय प्राणी) एकत्र येऊन तयार झालेली एक कॉलोनी आहे. यांना शास्त्रीय परिभाषेत सायफनोफोर म्हटले जाते. यातील  प्रत्येक प्राण्याला पॉलीप  म्हणतात. हे पॉलीप एकमेकांशी एकरूप झालेले असतात आणि त्यांना स्वतंत्र आस्तित्व उरत नाही. एकमेकांसोबत राहणाऱ्या या प्राण्यांची ही  वसाहत एकत्र काम करते आणि एक जेलीफिश म्हणून जगते. त्यांच्या निळसर जांभळ्या रंगाच्या वायूने भरलेल्या पिशवीला न्यूमॅटोफोर म्हटले जाते आणि याच्या मदतीने हे जीव पाण्यात तरंगू शकतात. या पिशवीत जवळपास १४% कार्बन मोनॉक्साईड असतो आणि हवेतील प्राणवायू, नायट्रोजन आणि अरगॉन हे वायूसुद्धा या पिशवीत घेतले जातात. या पिशवीला असलेल्या सायफनमधून हवे तेव्हा हे वायू काढून टाकून जेलीफिश पाण्यात बुडी मारू शकतो. 

काही पॉलिपोईड्सपासून या जेलीफिशची शुंडके तयार होतात. यातील काही संरक्षणासाठी, काही प्रजोत्पादनासाठी तर काही खाद्यग्रहण करण्यासाठी बनलेली असतात. संरक्षणासाठी असणारी शुंडके १० ते ३० मी. लांब असू शकतात. या शुंडकांवर निमॅटोसिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेशी असतात. या पेशी, शुंडकांच्या संपर्कात येणाऱ्या जीवांना, त्यांच्यातील विषारी द्रव टोचतात. मासे, माकूळ हे या द्रवामुळे अर्धमेले होतात. मग इतर शुंडकांच्या मदतीने ते पकडून अन्नग्रहण व पचन करणाऱ्या पॉलिपोईड्सकडे हे भक्ष्य आणले जाते. त्यातून स्रवणाऱ्या विकरांच्या मदतीने हे अन्न पचवले जाते अशी महिती त्यांनी दिली.

निमॅटोसिस्ट या पेशी इंजेक्शन सारखे काम करतात. यात विषारी द्रव आणि ते टोचण्यासाठी एक सुईसारख्या भाग असतो आणि जेलीफिश मृत झाले तरी या पेशी आपले काम करतच राहतात. किनाऱ्यावर येऊन पडलेल्या जेलीफिशच्या शुंडकातील हा विषारी द्रव तेव्हाही तेवढाच कार्यक्षम असतो. त्यांच्या शुंडकांच्या तडाख्यात येणाऱ्या लोकांना, हा द्रव त्यांच्या शरीरात टोचला जाऊन त्रास होऊ शकतो. कित्येकदा या जेलीफिशची शुंडके तुटून समुद्रात तरंगत राहतात आणि पाण्यात पोहणाऱ्यांना ती चिकटली तरी हा द्रव त्यांच्या शरीरात टोचला जातो. यामुळे शरीराच्या ज्या भागाला ही  शुंडके चिकटली असतील त्या भागावर लाल चट्टे उठून खूप वेदना  होतात. टोचल्या गेलेल्या विषाच्या प्रमाणानुसार ही लक्षणे काही तास ते २-३ दिवस राहू शकतात. हे विष लसीका ग्रंथींपर्यंत पोहोचले अॅलर्जीसारखी लक्षणे दिसतात. यात घशाला सूज येणे, श्वसन मार्गात अडथळा जाणवणे, हृदयाच्या कार्यात अडथळा, ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, थंडी वाजणे आणि क्वचित काही प्रसंगी मृत्यू असे परिणाम दिसू शकतात अशी माहिती डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिली.

शुंडके चिकटलेल्या जागी विषातील यूट्रीकार्सिनोजेनिक घटकांमुळे जखमा होतात. बाधित जागा खाजवू अथवा जोरजोरात पुसू नये. यामुळे चिकटलेले निमॅटोसिस्ट आणखीनच विष टोचण्याची क्रिया करतात व अधिक विष शरीरात टोचले जाते. अशा वेळी शुंडके चिकटलेली जागा खाऱ्या पाण्याने, विशेषतः गरम खाऱ्या पाण्याने स्वच्छ धुवावी. अशा वेळेस व्हिनेगर किंवा अमोनियाचे द्रावण ही लावण्याचा सल्ला दिला जातो. पण काही वेळेस निमॅटोसिस्टमधील विष सोडण्याची प्रक्रिया वाढून, याचा विपरित परिणाम होऊ शकतो. बाधित जागा स्वच्छ धुवून त्यावर शेविंग क्रिम लावून रेझरने ती जागा साफ करावी.हे करताना प्रत्येक वेळी रेझर परत धुवावा. यामुळे चिकटलेले निमॅटोसिस्ट काढून टाकता येतात. गरम खाऱ्या पाण्यानेही हे विष निष्प्रभ करता येते. डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर योग्य ते स्किन ऑईन्मेंट लावावे असे यावर विविध उपचार त्यांनी सांगितले. 

वारा, सागरी प्रवाह आणि भरती ओहोटी यांच्यानुसार त्यांचा प्रवास सुरु असतो. उष्णकटीबंधीय समुद्रात आढळणारे हे जेलीफिश आपल्याकडे जूनपासून किनाऱ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किनारी भागाकडे ढकलले जातात. अचानक सुरु झालेले आणि मोठी भरती यामुळे हे जेलीफिश आपल्या किनाऱ्यावर सध्या येऊन पडले आहेत. पावसाळ्याच्या महिन्यांत किनाऱ्याशी उपलब्ध असणारे भक्ष्य किंवा खाद्य यामुळे ही जेलीफिश किनाऱ्याकडे आकर्षित होतात. या काळात प्रजोत्पादन करण्यासाठी योग्य वातावरण त्यांना उपलब्ध असते. यामुळे या ठराविक कालावधीत हे जेलीफिश आपल्याकडे आढळत आहेत. दिसायला सुंदर आणि आकर्षक असले तरी ते विषारी आहेत हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे अशी माहिती डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिली.  

टॅग्स :मुंबई