कुलदीप घायवट मुंबई : मुंबई आणि उपनगरात पिढ्यान्पिढ्या जोपासण्यात आलेल्या डेरेदार वृक्षांवर विषाची ‘संक्रांत’ आली आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी डेरेदार वृक्षांवर विषप्रयोग करीत त्यांना मुळासकट मारण्याचा कट आखत तो साध्यही केला जात आहे. आरेसह ठिकठिकाणांवरील खासगी विकास प्रकल्पांत वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटनांत मागील काही वर्षांत भर पडली असून, याबाबत कारवाई करणारी यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे. विशेषत: मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणांनी अशा प्रकरणांत वेगाने कारवाई करण्याची गरज आहे. परंतु इच्छाशक्तीचा अभाव आणि हिरवळ पर्यायाने निसर्गाच्या आहुतीवर आधारलेला विकासकाचा स्वार्थ; या दोन प्रमुख घटकांमुळे मुंबापुरीतल्या डेरेदार वृक्षांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. विकास पर्यावरणाच्या मुळावर आल्याने मुंबईसाठीही ही धोक्याची घंटा आहे.मुंबई शहराची फुप्फुसे म्हणून ओळखल्या जाणाºया आरे दुग्ध वसाहत येथील युनिट क्रमांक १३मधील पिंपळ व जांभळाच्या खोडावर छिद्रे पाडून विषारी द्रव्याचा वापर करत झाडांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप नुकताच स्थानिकांनी केला. या प्रकरणी आरे येथील वनराई पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली. आता या घटनेचा तपास सुरू आहे. मात्र आरे येथील घटना वगळता उर्वरित घटना समोर येत नाहीत. आरेतल्या स्थानिकांनी किमान आरोप केल्याने ही घटना समोर आली. परंतु आजही मुंबई शहर आणि उपनगरात विकासाच्या नावाखाली थेट हिरवळीची कत्तल केली जात आहे. काही वर्षांपूर्वी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयालगतच्या रोडवरील किमान पाच ते सात झाडे पूर्णत: सुकल्याचे निदर्शनास आले होते. हाच प्रकार सांताक्रुझ येथे झाल्याचे निदर्शनास आले होते. दादर येथील शिवाजी पार्क मैदानालगतच्या झाडांनाही कीड लागण्याचा प्रकार नवा नाही. घाटकोपर येथेही एका बांधकाम व्यावसायिकाने विकासाच्या नावाखाली अनेक वृक्षांचा बळी घेतला होता. स्थानिकांनी या प्रकरणी महापालिकेकडे तक्रारही केली होती. प्रत्यक्षात कारवाई काहीच झाली नाही.झाडांबाबत जे आहे; तेच तिवरांबाबत आहे. पश्चिम उपनगरासह माहीम, मालाड, गोराई आणि पूर्व उपनगरात चेंबूरलगतच्या गावठाणांमधील तिवरांच्या कत्तली वेगाने सुरू आहेत. मुळात झोपड्या उभारण्यासह खासगी विकास प्रकल्पांसाठी हिरवळीवर ‘संक्रांत’ आली असून, या प्रकरणी प्रशासनाने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे म्हणणे पर्यावरणतज्ज्ञांनी मांडले आहे.आरे कॉलनीचा संपूर्ण परिसर ३ हजार १६६ एकरवर पसरलेला आहे. मागील ४७ वर्षांपासून आरे जंगलात झाडे लावण्यात येत आहेत. यातील अनेक वृक्ष डेरेदार झाले आहेत, पण स्वार्थ तसेच विकासाच्या नावाखाली काही जण या झाडांची कत्तलकरीत आहेत, असा स्थानिकांचा आरोप आहे.मोक्याच्या जागेसह सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्याकरिता वृक्षांवर विषप्रयोग करण्याचेषड्यंत्र राबविले जात आहे.मालाड, कांदिवली, गोरेगाव, बोरीवली, दहिसर येथे असे अनेक प्रकार होतात. मॉल, हॉटेल्स, बांधकामांना अडथळा असलेल्या वृक्षांची विषप्रयोग करून कत्तल केली जाते.वृक्षाच्या खोडावर खिळे ठोकून विष टाकले जाते. दोन ते तीन इंच खोल छिद्रात विष टाकल्यावर त्यातून पांढºया रंगाचा चिवट द्रव बाहेर येतो. हा द्रव म्हणजेच रासायनिक विष आहे, असे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे कोट्यवधींचा निधी पडून असताना बैठकीत केवळ झाडे तोडण्याचेच प्रस्ताव संमत होतात. यावर सदस्य काहीच बोलत नाहीत, असा स्थानिक, पर्यावरणतज्ज्ञांचा आरोप आहे.झाडे जगवणे महत्त्वाचेनिव्वळ स्वत:च्या स्वार्थासाठी झाडांवर अॅसिडचा मारा केला जातो. अॅसिड ही सहजासहजी न मिळणारी वस्तू आहे. त्यामुळे लोक अॅसिड कुठून मिळवतात हे शोधून काढायला पाहिजे. प्रत्येकाने झाडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. झाडांचे कोणतेही तोटे नसूनही ते लावण्यास लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे झाडे लावणे व ती जगवणे महत्त्वाचे आहे.- डॉ. अविनाश पाटील,प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र, बिर्ला महाविद्यालय, कल्याणअॅसिडचा वापरबिल्डर्स, हॉटेल मालकांकडून झाडांवर विषप्रयोग केले जातात. झाडे सुकण्यासाठी वेगवेगळ्या अॅसिडचा वापर करण्यात येतो. यात सल्फ्युरिक आणि हायोड्रोक्लोरिक अॅसिडचा समावेश असू शकतो. झाडांच्या आजूबाजूला खड्डा करून त्यात २ महिन्यांच्या कालावधीत अॅसिडचा वापर करून झाडाला मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. झाडांच्या प्रतिकारात्मक शक्तीनुसार झाडावर परिणाम दिसून येत असतात. काही वेळेला झाडाच्या खतामध्ये अशा प्रकारच्या अॅसिडचे रसायन मिश्रित करण्यात येते.- जयश्री गायकवाड,प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र, साठे महाविद्यालय, विलेपार्लेमाफियांचा हातसद्य:स्थितीमध्ये झाडे व गवत मारणे काही मोठे काम राहिलेले नाही. झाडाला इंजेक्शन मारून अथवा अॅसिडचा वापर करून ते मारले जाते. या कामामध्ये लाकूड माफिया, बिल्डर्स, हॉटेल्स मालकांचा समावेश असतो. झाडावर अॅसिडचा मारा करून त्यांना कमजोर केले जाते. त्यानंतर झाड तोडण्याची परवानगी मिळवली जाते आणि ती तोडली जातात. वृक्षतोड केल्यावर २ हजार रुपये दंड आकारला जातो. पण त्या झाडांचे लाकूड विकून २५ ते ३० हजार रुपये कमविले जातात. तोडलेल्या झाडांची उंंची, लांबी यांची नोंद करून संपूर्ण अहवाल पालिकेने संकेतस्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे. मात्र, असे होत नाही. आरेमध्ये सकाळी कडक पहारा दिला जातो. पण रात्रीच्या वेळी झाडांची तोड करून लाकूड माफिया लाकूड नेतात. संवर्धन करणे खर्चीक बाब असली तरी ते करणे गरजेचे आहे. वरळी सी फेस, मुंबई विद्यापीठाच्या मागील बाजूस झाडे सुकत चालली आहेत. पर्यावरण कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की, झाडांच्या चहूबाजूने सिमेंट, क्राँकीट टाकले जाऊ नये. मात्र कायदा धाब्यावर बसवला जातो.- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्तीझाडावर मिलीबग नावाची कीड लागल्यामुळे झाडे आतून पोकळ होतात. मिलीबग या किडीचा प्रादुर्भाव कमजोर झाडांवर लवकर होतो. झाडांवर रोग प्रतिबंधात्मक उपचार करून कीड नष्ट करता येते. पण त्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. झाडे तोडली जातात. महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि अॅपद्वारे याबाबतच्या तक्रारी करता येतील.- डॉ. सोनल तावडे, प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र, बिर्लामहाविद्यालय, कल्याण
वैयक्तिक स्वार्थासाठी झाडांवर विषप्रयोग, विकास पर्यावरणाच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 2:15 AM