मागोवा २०२० : कॉमन इंट्रो - २०२०ला राम राम; आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:06 AM2020-12-31T04:06:40+5:302020-12-31T04:06:40+5:30
कोरोना विषाणूने २०२० साली जगभर थैमान घातले. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आणि कोरोनाचा परिणाम सर्वच ...
कोरोना विषाणूने २०२० साली जगभर थैमान घातले. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा आणि कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. अर्थकारणापासून राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रे कोरोनाने ढवळून काढली. पहिला फटका बसला तो सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेला. कोरोनाला हरविण्यासाठी महापालिकेने जीवाचे रान केले. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रभावही कमी झाला. या दरम्यान महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. किती तरी कर्मचारी गमावले. बेस्टसह रेल्वेलाही असाच फटका बसला. आरोग्य क्षेत्रावर कितीतरी पटींनी ताण आला; आजही तो कायम आहे. लॉकडाऊनच्या काळात घरफोडीचे गुन्हे वाढले. सर्व व्यवहार डिजिटल होत असल्याने सायबर विश्वही ढवळून निघाले. सायबर क्षेत्रातही गुन्हेगारी वाढली. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरण सुधारले असले तरी बंद असलेल्या कामांमुळे मुंबईतल्या पायाभूत सेवासुविधांना तब्बल नऊ महिन्यांचा विलंब होत आहे. हॉटेल इंडस्ट्री, वाहतूक क्षेत्र रसातळाला गेले. बॉलीवूडमधील दिग्ग्ज कलाकारांनी जग सोडले. बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा असो वा ईडी कारवाई; अशा अनेक घटनांनी २०२० वर्ष गाजले. राजकीय क्षेत्रात तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक होत राहिली. अशा काहीशा घटनांनी सरत असलेल्या २०२०ला आता निरोप देण्याची वेळ आली आहे. उंबरठ्यावर असलेल्या २०२१कडून सर्वांनाच सकारात्मक बदलांच्या अपेक्षा आहेत. त्या दृष्टीने पावलेदेखील उचलली जात आहेत. त्यामुळे २०२०ला राम राम आणि २०२१ सर्वांना सर्वच दृष्टिकोनातून सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो; याच शुभेछा...