महापालिकेत ८३ संख्याबळ असल्याने दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपने दोन वर्षे ‘पहारेकऱ्या’ची भूमिका निभावली होती. मात्र मार्च २०२० मध्ये भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. परंतु, विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती यापूर्वीच केली असल्याने या पदासाठी नवीन निवड शक्य नाही, अशी भूमिका घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका महासभेत भाजपचा दावा फेटाळला.
* कोरोनाचे संकट
मार्चपासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. १७ मार्च रोजी कोरोनाने पहिला बळी घेतला. त्यानंतर या विषाणूचा झपाट्याने प्रसार होत मुंबईचे अनेक विभाग हॉटस्पॉट बनले. रुग्णालयांत खाटा, वैद्यकीय कर्मचारी कमी पडू लागले. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले.
* आयुक्तांची तडकाफडकी उचलबांगडी
कोरोनाचा संसर्ग वाढत गेल्याने मुंबईतील परिस्थिती बिकट झाली. याचे परिणाम तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांना भोगावे लागले. मे २०२० मध्ये राज्य सरकारने परदेशी यांची तडकाफडकी बदली करीत इकबाल सिंह चहल यांच्याकडे पालिकेची धुरा सोपविली.
* अखेर मुंबई कोरोनामुक्तीच्या दिशेने
मे महिन्यानंतर महापालिकेने आपल्या धोरणात बदल करीत जंबो सेंटर्स, काळजी केंद्रांची स्थापना, कंत्राटी भरती, ‘चेस द व्हायरस’, ‘मिशन झीरो’ अशा मोहिमा सुरू केल्या. यामुळे सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेला धारावी विभाग कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जगासाठी आदर्श ठरला. जूननंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यात महापालिकेला यश येऊ लागले. मात्र या लढ्यात पालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांपासून साहाय्यक आयुक्तांपर्यंत दीडशेहून अधिक योद्ध्यांचे बळी गेले.
* कोविड घोटाळा आणि चौकशी
कोविड काळात औषध, उपकरणांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या मुलाच्या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोपही करण्यात आला. कोरोना काळात महापालिकेने सुमारे १६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या प्रत्येक खर्चाचा हिशोब नगरसेवकांनी मागितला आहे. या काळातील सर्व खरेदीची चौकशी लेखापरीक्षकांमार्फत करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.
-----------------------------------