कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. एक्स्प्रेस गाड्यांऐवजी विशेष गाड्या सुरू आहेत. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ९० टक्के गाड्या सुरू आहेत. मात्र त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला, वकील, सुरक्षारक्षक यांनाच प्रवासाची मुभा आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्तेवाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
किसान रेल्वेचे शतक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमारपर्यंत १००व्या किसान रेल्वेला झेंडा दाखवून रवाना केले. किसान रेल्वे गाड्या ताज्या भाजीपाला आणि फळांची देशाच्या विविध भागात वाहतूक करीत आहेत. छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चांगला नफा मिळवता येतो.
सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकल
मध्य रेल्वेने सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकल रेल्वेला हिरवा कंदील दाखवला आहे. सोमवार ते शनिवार या एसी लोकलच्या १० फेऱ्या मध्य रेल्वेमार्गावर धावणार आहेत. सध्या एसी लोकलला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवासही थंडगार होत आहे.
कोरोना काळात माल आणि पार्सल वाहतूक
लॉकडाऊन व अनलॉक मार्च ते डिसेंबर या कालावधीत रेल्वेने आवश्यक वस्तू व मालवाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मार्च २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत उद्योग क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने मालाची यशस्वीपणे वाहतूक केली आहे. यासोबत पार्सलचीदेखील वाहतूक केली आहे, ज्यात औषधे आणि फार्मा उत्पादने, ई-कॉमर्स वस्तू, मेल आणि इतर हार्ड पार्सल, दूध इत्यादी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
रेल्वेचे विविध उपक्रम
मध्य रेल्वे परळ कार्यशाळेने ४५ दिवसांच्या कमी कालावधीत मोटार वाहून नेण्यासाठी एक प्रोटोटाइप कोच विकसित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने मुंबई विभागात आरपीएफ कर्मचारी व्यवस्थापनासाठी आणि प्रवासी सुरक्षेसाठी ई-पेट्रोलिंग व्यवस्थापन ॲप सुरू केले आहे. यामुळे ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांची प्रभावी देखरेख आणि रिअल टाइम मॉनिटरिंग करता येणार आहे.