एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यातच लॉकडाऊन काळात एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे खर्चाची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, ही योजना रखडली होती. आता या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिलासा मिळणार आहे.
२पेट्रोल - डिझेल पंप सुरू
सर्वसामान्य जनतेला सुलभतेने, गुणवत्तापूर्ण व योग्य मात्रेचे इंधन उपलब्ध व्हावे, या हेतूने राज्यभरातील महामंडळाच्या निवडक ३५ मोक्याच्या/प्रवाशी वर्दळ असलेल्या ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल - डिझेल पंप सुरू करण्यात येत आहेत. अर्थात, एसटी महामंडळाकडे गेली ७२ वर्षे पेट्रोल आणि डिझेल पंप चालविण्याचा अनुभव आहे. हे पंप महामंडळ अंतर्गत बसेससाठी चालवत होते. सध्या नव्याने इंडियन ऑइल यांच्या सहकार्यातून सदर पेट्रोल-डिझेल पंप सुरू करण्यात येत आहे.
३.एसटीची मालवाहतूक
सर्वसामान्य शेतकरी, छोटे उद्योजक, व्यावसायिक, कारखानदार यांच्या मालाची किफायतशीर दराने सुरक्षित व वक्तशीर वाहतूक करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने व्यावसायिक स्तरावर मालवाहतूक सुरू केली आहे. सध्या एसटीची, १०५० मालवाहू वाहने तयार आहेत. राज्यांतर्गत आंब्याची रोपे, काजूची बोंडे, बी-बियाणे, खते आशा कृषिजन्य पदार्थापासून रंगाचे डबे, लोखंडी पाइप अशा अनेक विविध वस्तूंची मालवाहतूक एसटीच्या मालवाहू वाहनातून सुरू आहे.
४. कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन
प्रवाशांना प्रवासादरम्यान तिकीट काढण्यासाठी सुट्ट्या पैशांची चणचण जाणवत असते, तसेच कोविड १९ या काळामध्ये सुरक्षित अंतर ठेवून ऑनलाइन आर्थिक व्यवहाराला शासनाने चालना दिलीआहे. त्यासाठी प्रवाशांसाठी कॅशलेस स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहे. या स्मार्ट कार्डचा उपयोग कुटुंबातील कोणताही सदस्य उपयोग करू शकतो, तसेच शंभर रुपयांच्या पटीमध्ये ऑनलाइन भरणा करायची सुविधाही या स्मार्ट कार्डमध्ये समाविष्ट आहे.
५कोरोना काळात एसटीची दमदार कामगिरी
कोरोनाच्या काळात एसटीने विविध ठिकाणी प्रवासी दळण-वळणाची सेवा देऊन शासनाच्या आरोग्य, पोलीस, महसूल, परिवहन या विभागांच्या खांद्याला खांदा लावून दमदार कामगिरी केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी ई. लोकांची वाहतूक यशस्वीपणे पार पाडली.